Bail Pola : सर्जा-राजाच्या साजश्रृंगाराला महागाईची टोचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bail Pola 2022

Bail Pola : सर्जा-राजाच्या साजश्रृंगाराला महागाईची टोचणी

नागपूर : कधी ओल्या, कधी कोरड्या दुष्काळाच्या चक्रात अडकलेला शेतकरी पुन्हा पुन्हा उद्वस्त झाल्यानंतरही मनात जगण्याची उमेद ठेवून प्रत्येक हंगाम साजरा करतो. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने अख्खा खरीप हंगाम गोत्यात आला असल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसतानाही शेतकरी आज पुन्हा सर्जाराजाच्या सजावटीला सामोरा जात आहे. मनातील दुःखाला विसरून भावनांना सतत हिरवळ देणारा शेतकरी राजा प्रत्येक संकटाला मातीत पुरुन टाकतो. त्याला कष्टाची साथ देणाऱ्या सर्जाराजाची तो खांदशेकणी करण्यास सज्ज झालेला आहे.

यांत्रिकीकरणामुळे दुरावला ओलावा

पूर्वीच्या काळात गावातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी होती. परंतू गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात गोधन मोठ्या प्रमाणात नामशेष होत चालले असून कृषी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालत आहे. गोधन संपत असल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे. १५-२० हजार लोकवस्तीच्या गावात बैलजोडीची संख्या बोटांवर मोजण्याइतकी झाली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीचे कामे सुलभ झाले असले तरी मुक्या जीवाविषयीची कृतज्ञता आटणार तर नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दुकानदार बघतात ग्राहकाची वाट

मागील वर्षाच्या तुलनेत सजावटीच्या साहित्यात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कोरोना व अतिवृष्टी लक्षात घेता शेतकरी ज्या प्रमाणात सजावटीचे साहित्य घेण्यास यायला पाहिजे त्याप्रमाणात शेतकरी आले नसल्याने दुकानदार त्यांची वाट बघतोय. येसन, बाशिंग, घुंगरू, माळ, झूल, मटाट्या, दोर, कासरे, कवडीच्या माळा, शिंगांना लावणारे रंग आदी साहित्य मोठ्या प्रमाणात महाग झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चर्चेचा झाला आहे.

आज बैलांचे खांदमर्दण

सावनेरः आज पोळ्याचा आदला दिवस. बैलांच्या खांदेमळणीचा व त्यांना उद्याच्या जेवणाचे आमंत्रण देणारा असल्याने या सणाची तयारी दोन दिवसांआधीपासूनच केली जाते. त्यामुळे शेतकरी पोळा उत्सवासाठी सज्ज दिसत आहेत. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना विश्रांती देऊन खांदेमळणी करून जेवणाचे आमंत्रण देण्याची परंपरा आजही शेतकऱ्यांमध्ये जोपासल्या जात आहे. याच परंपरेनुसार आज पोळा सणाच्या पूर्वसंध्येला शेतकरी आपल्या जिव्हाळ्याचा मित्र असलेल्या सर्जाराजाची खांदे मळणी करून त्यांना उद्याच्या जेवणाचे आवतन देणार आहे.

Web Title: Bail Pola 2022 Festival Inflation Decorations Farmer Agriculture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..