पोस्ट कोविड परिणामांसाठी सज्ज राहा; शास्त्रज्ञांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी राहिलेल्या रूग्णांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Post Covid : पोस्ट कोविड परिणामांसाठी सज्ज राहा; शास्त्रज्ञांचे आवाहन

नागपूर - कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी राहिलेल्या रूग्णांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातील बहुतांश लोकसंख्या कोविडोत्तर श्वसन, हृदय आणि मानसिक आजारांनी ग्रस्त असून, आपल्या सर्वांनाच आता पोस्ट कोविड परिणामांसाठी सज्ज राहवे लागेल, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या दूसऱ्या दिवशी कोरोना साथीच्या दीर्घकालीन परिणामांची मांडणी करणाऱ्या एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे अध्यक्षस्थान संक्रमणकारी आजारांती ज्येष्ठ संशोधक डॉ. राकेश अग्रवाल यांनी भूषविले. ते म्हणाले, "कोरोनामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम झाले आहे. कोरोना बाधितांमध्ये दोन प्रकार होते. पहिल्या प्रकारात लवकर बरे होणारे, तर दूसऱ्या प्रकारात दीर्घकालीन आजारी असलेल्या रूग्णांचा समावेश होतो. यात १२ आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे." विविध देशांत २० ते ६० टक्के कोरोना रूग्णांना पुन्हा कोरोना झाल्याची नोंद असल्याचेही शास्त्रज्ञांनी यावेळी स्पष्ट केले.

दीर्घकालीन कोरोनाची व्याख्या -

- १२ आठवड्यानंतरही कोरोनाची लक्षणे

- सातत्याची डोकेदुखी, चिडचिड, तणाव, कॉग्नेटिव्ह डिसफंक्शन

- दोन महिन्यानंतरही निदान न होणारे लक्षणे

कारणे -

- कोरोना मुख्यतः रोगप्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू

- स्टेरॉईडसह इंतर अॅंटी बायोटीक्सचा अनियंत्रित वापर

- अतिदक्षता विभागात यांत्रिक पद्धतीने उपचार

- सहव्याधी आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव

परिणाम -

- सततची डोकेदुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे

- हृदय आणि श्वसनाशी निगडीत आजारांमध्ये वाढ

- जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढणे

पुरेसा डेटा नसल्यामुळे नवीन आलेल्या कोणत्याही व्हेरीएंटचे दीर्घकालीन परिणामांचा आत्ताच अंदाज बांधता येणार नाही. फक्त एवढं नक्की आहे की, लसीकरणामुळे मृत्यूची भिती कमी झाली आहे.

- डॉ. देवेंद्र अग्रवाल, ट्रान्सलेशन संशोधन विभाग, वेस्टर्न युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया, अमेरिका

कोरोनाच्या पहिल्या आणि दूसऱ्या लाटेत अनावश्यक उपचार पद्धतीचा वापर झाला. तसेच स्टेरॉईडच्या अतिवापरामुळेही पोस्ट कोविड समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

- डॉ. तनू सिंघल, कोकिळाबेन धिरूबाई अंबानी रूग्णालय , मुंबई

कोरोनानंतर तीन पैकी एकाला मानसिक आजाराने त्रस्त केले आहे. जगात तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात राहत असाल, कोरोनाने मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम केल्याचे पाहायला मिळाले आहे.

- डॉ. विद्यालक्ष्मी सल्वराज, ओहामा सायकॅट्री सर्विसेस, अमेरिका

पोस्ट कोविड रूग्णांचे प्रकार -

१) सर्वसाधारण लक्षणे - ८० टक्के

२) श्र्वसनाशी निगडीत त्रास (खोकला, श्वासोच्छवासाचा त्रास, आदी) - ५.८ टक्के

३) मानसिक त्रास (उदा. नैराश्य, भिती, तनाव) - १४.२ टक्के

टॅग्स :AppealScientistCovid