esakal | Nagpur: बसची वाट पाहणाऱ्या चौघांना कारने चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur: बसची वाट पाहणाऱ्या चौघांना कारने चिरडले

Nagpur: बसची वाट पाहणाऱ्या चौघांना कारने चिरडले

sakal_logo
By
गजेंद्र डोंगरे

कोंढाळी बाजारगाव : सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने गावाला जाण्यासाठी आजोबा त्यांच्या दोन नाती आणि एका नातवासह सातनवरी फाट्याजवळ बसची वाट पाहत उभे होते. मृत्यू कसा आणि कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. बसची वाट पाहत असताना अमरावतीकडून वेगात येणारी कार अनियंत्रित झाली आणि चौघांना चिरडत नेले. मनाचा थरकाप उडविणाऱ्या या भीषण अपघातात आजोबा गौतम जागो सालवंकर (वय ५५, सातनवरी),नातू शौर्य डोंगरे (वय ९, मौदा नजिक इसापूर),नात शिराली सुबोध डोंगरे (वय ६, सातनवरी) आणि चिनू विनोद सोनबरसे (वय १३, सातनवरी) यांचा मृत्यू झाला. तसेच ललिता बाबूलाल सोनबरसे (वय ५०, सातनवरी) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नागपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या कारने चौघांचा जीव घेतला त्यातील चार जण किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

एमएच-२७-बीई ४६१४ या क्रमांकाची मारोती कार अमरावती येथून भरधाव नागपूरकडे निघाली होती. सातनवरी येथे पाऊस असल्याने महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार अनियंत्रित झाली आणि चौघांना चिरडत नेले. डॉ. आशुतोष चंद्रकांत त्रिपाठी(वय २७) हा कार चालवीत होता. या अपघातात गौतम सालवंकर, भाऊ बहिण शौर्य शिराली सुबोध डोंगरे, चिनू विनोद सोनबरसे यांचा जागीच मृत्यू झाला.

ठाणेदार चंद्रकांत काळे, सहायक निरीक्षक अजित कदम व पोलिस स्टाफसह घटनास्थळी पोहचल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

बसची वाट पाहत उभ्या चौघांना कारने चिरडले

राहुल माखनिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, नागेश जाधव, ठाणेदार चंद्रकांत काळे आदी घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर कोंढाळी पोलिसांनी कारचालक डॉ.आशुतोष त्रिपाठीं व कारमधील सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

नागपूर-अमरावती महामार्गावरील पडलेल्या खड्ंड्याबाबत सातनवरी येथील सरपंच विजय चौधरी तसेच गावकऱ्यांनी गोंडखैरी येथील अटलांटा येथील व्यवस्थापकास वारंवार लेखी तक्रारी करूनही खड्डे बुजविले गेले नाहीत. परिणामी रविवारी खड्डा वाचविण्याच्या नादात अनियंत्रित झालेली कार मुख्य मार्ग सोडून दुभाजकावर आदळली. महामार्गावरील खड्डे बुजविले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सातनवरी येथील सरपंच विजय चौधरी, माजी सरपंच ताराचंद चालखोर, सांजाभाऊ भोंगे, अनिल काळभांडे, साहेबराव गोतमारे, रोशन रेवतकर, राहुल निगोट यांनी अटलांटा कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या प्रवाशांना एसटीने बसमध्ये घ्याव, अशीही मागणी केली आहे.

कार दुभाजकाला धडकून पाच जणांवर आदळली

कारचा वेग एवढा होता की तिने दुभाजकाला धडक दिली आणि नंतर सर्व्हिस रोडवरील दुभाजकावर बसलेल्या पाच प्रवाशांवर जाऊन आदळली. या पाचही जणांना तेथून निघून जाण्यास क्षणाचाही वेळ मिळाला नाही. चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ललिता सोनबरसे गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतर कारने तीन पलट्या खाल्ल्या. एअरबॅग उघडल्याने कारचालक आशुतोष, ऐश्वर्या विनायक सारवे, श्रद्धा महेश सोनी बचावल्या. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघात होताच गावकरी धावले. त्यांनी कोंढाळी पोलिसांना माहिती दिली. अपघातात सापडलेल्या सर्वांना बाजारगाव येथील देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात आणले. तिथे चौघांना मृत घोषित करण्यात आले.

साक्षगंधासाठी आले होते

आठ दिवसांपूर्वी गौतम उर्फ बंडू सालवंकर यांच्याकडे साक्षगंधासाठी पाहुणे म्हणून आले होते. बंडू यांच्या मुलाचे साक्षगंध झाले. काही पाहुणे पूर्वीच निघून गेले होते. पण सध्या शाळा असल्याने लहान मुले सातनवरी येथेच राहिले. उद्या शाळा सुरू होणार असल्याने गौतम सालवंकर त्यांना मौदा, इसापूर येथे सोडण्यासाठी बसची वाट पाहत उभे असताना काळाच्या रूपात आलेल्या कारने चौघांचा जीव घेतला. काहीच चूक नसताना चिमुकले या जगातून निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top