"महाविकास आघाडीचे सरकार पडणार पण त्यांना आताच सावध का करू?"

sudhir mungantiwar sudhir mungantiwar
sudhir mungantiwar sudhir mungantiwar

नागपूर ः महाविकास आघाडीचे सरकार येऊन तब्बल दीड वर्षांचा काळ उलटला तरी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील वादविवाद काही संपता संपत नाहीये. भाजप अजूनही महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी उत्सुक आहे. याबद्दलची भविष्यवाणी आज माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. मात्र सरकार पडणार आहे याबाबदल मी सत्ताधाऱ्यांना आताच सावध करू इच्छित नाही असे विधान त्यांनी केलंय.  

"सरकार कसे पडेल हे आत्ता जर सांगितले तर सत्ताधारी सावध होतील. त्यामुळे त्यांना सावध कशाला करू? जनहितविरोधी सरकार यापुढे कायम ठेवायचं नाही, हे आमचे ठरलं आहे." असं मुनगंटीवारांनी म्हंटल आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपून नागपुरात आल्यानंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. 

आजच्या संकटाच्या काळातसुद्धा जनतेला मदत करण्याऐवजी हे सरकार केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण करत आहे. त्यामुळे 'या सरकारमधलेच काही जण बाहेर पडतील आणि हे सरकार पडेल' असे भाकीतही त्यांनी केले आहे. 

संधी नसतानाही जबरदस्ती बेईमानी करून हे सरकार महाराष्ट्रात राज्य करीत आहे. सरकारने जनसेवा करण्याऐवजी, जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी सुडाचे राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आहे. जनहितविरोधी निर्णय घेणारे सरकार दीर्घकाळ टिकू शकत नाही. निश्‍चितपणे हे सरकार जाणारच, असा पुनरुच्चार आज राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

केवळ बोंबा ठोकुन उपयोग नाही 

डेलकरांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारचे हात कुणी बांधून ठेवलेले नाहीत. त्यांनी खुशाल चौकशी करावी. विशेष कायदा निर्माण करून, विशेष कोर्ट तयार करावे आणि कारवाई करावी. केवळ बोंबा ठोकून काहीही होणार नाहीये. शेतांमध्ये काम करणारा शेतकरी, शेतमजूर अडचणीत आहे. त्याच्यासाठी काहीतरी करा ना, असा सल्ला मुनगंटीवार यांनी सरकारला दिला.

खोटे बोलणारे सरकार टिकू शकत नाही 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज जोडण्या कापण्याच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आणि अधिवेशन संपता संपता शेवटच्या क्षणी सरकारचा खरा चेहरा समोर आला. काल सरकारने घोषणा केली की, आम्ही ही स्थगिती हटवतो आहे. असे धडधडीत खोटे बोलणारे सरकार टिकू शकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

सरकारशी संघाचा संबंध नाही 

आज सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संघ मुख्यालयात डॉ. मोहन भागवत यांना भेटायला गेले आणि तेव्हाच  महाविकास आघाडी सरकार पडणार असे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावर बोलताना फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दुसऱ्या कामासाठी संघ मुख्यालयात गेले होते. तसेच संघ आणि भाजप एकमेकांना विचारून राजकारण करत नाही. सरकारचा आणि संघाचा काही संबंध नाही असेही ते म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com