esakal | तीनच्या प्रभागाने भाजप नाखुश? पक्षातील नेत्यांना चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

तीनच्या प्रभागाने भाजप नाखुश? पक्षातील नेत्यांना चिंता

sakal_logo
By
राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तीन नगरसेवकांच्या प्रभाग (three member ward system) पद्धतीवर मुख्यमंत्री ठाम असल्याने वरवर भाजप (BJP) खुश दिसत असली तरी चार सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे नगरसेवकांबाबत नागरिकांची असलेली नाराजी कशी थोपवावी अशी चिंता पक्षाला सतावत आहे. चारपेक्षा एक सदस्यांच्या वॉर्डपद्धतीचा भाजपला जास्त फायदा झाला असता, असे एका ज्येष्ठ नगरसेवक व महापालिकेतील पदाधिकाऱ्याचे मत आहे.

हेही वाचा: भाजप नेते सामंतांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधान

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होताच बहुसदस्यीय पद्धत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे वॉर्डनिहायच निवडणूक होईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे नगरसेवक सावध झाले होते. आपआपल्या घराजवळचा परिसर बघा, असे धोरण भाजपने ठरविले होते. अनुभवी व सक्रिय नगरसेवकांनी आपआपल्या परिसरासाठी मोठा निधी खेचून आणला. विकासकामे केली. सोबत असलेल्या नगरसेवकाचाही निधी खेचून घेतला. ही बाब अद्यापही अनेक नगरसेवकांना कळलेली नाही. चारच्या प्रभागपद्धतीत भाजपने अनेक नवख्यांना संधी दिली होती. त्यातून महापालिकेत नवे नेतृत्व उदयाला येईल, अशी अपेक्षा होती. तसेच अनेक ठिकाणी जात, पदाधिकाऱ्यांची पत्नी, पक्षाची सेवाज्येष्ठता बघून उमेदवारी वाटप करताना ॲडजेस्टमेंट केले होते. त्यामुळे आपणास काही करायचे नाही. सिनिअर नगरसेवक आपला नेता आहे. तो सांगले तेवढे ऐकायचे असाच ग्रह प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांनी केला होता. साडेचार वर्षांत काहीच केले नाही, तक्रारीसुद्धा ऐकून घेतल्या नाही, काहींनी तोंडही दाखवले नाही, असा आरोप नगरसेवकांवर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजपविषयी प्रचंड रोष आहे. तो मतपेटीतून व्यक्त होईल, अशी भीती भाजपला सतावत आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा अनुभवी व क्रियाशील नगरसेवकांना महापालिकेच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. दुसरीकडे निष्क्रिय चेहरे मोठ्‍या प्रमाणात बदलावे लागणार आहेत. याशिवाय विकासकामांपेक्षा इतर मुद्यांवर निवडणूक फिरवावी लागणार आहे. तसेच नियोजन पक्षाच्या पातळीवर केले जात असल्याचे कळते.

मतपेटीला लागली ओहोटी -

भाजपच्यावतीने पक्षांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोठ्‍या प्रमाणात मतपेटीला ओहोटी लागली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बडे नेते कामाला लागले असून बूथ समित्यांवर त्यांनी जाणे सुरू केले आहे. दिवाळीपासून कार्यक्रम, बैठकांचा धडाका लावून पुन्हा महापालिकेच्या सामन्यात भाजपला परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

loading image
go to top