esakal | नागपुरात रेमडेसिवीरचा मोठा काळाबाजार, कामठीतील व्हिझिटिंग डॉक्टरसह चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा


नागपुरात रेमडेसिवीरचा मोठा काळाबाजार, कामठीतील व्हिझिटिंग डॉक्टरसह चौघांना अटक

नागपुरात रेमडेसिवीरचा मोठा काळाबाजार, कामठीतील व्हिझिटिंग डॉक्टरसह चौघांना अटक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कामठी (जि. नागपूर) : देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी बेडची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच रुग्णांच्या उपचारात लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे. याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे.

नागपूर शहर पोलिसांनी सापळा रचून असाच काळाबाजार समोर आणला. यात कामठी शहरातील आशा हॉस्पिटल मध्ये कार्यरत एका डॉक्टरलाही अटक करण्यात आलीय.

नागपुरसह कामठी शहरात सुरू असलेला रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आणून पोलिस उपायुक्त निलोत्पल यांचे विशेष पथक आणि जुनी कामठी पोलिसांनी डॉक्टरसह चौघांना अटक केली. त्यांच्याकडून १५ रेमडेसिवीर जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. लोकश शाहू, शुभम मोहदरे, कुणाल कोहळे व सुमित भांगडे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - "मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश हे आशा हॉस्पिटलमध्ये ‘व्हिझिटिंग’ डॉक्टर असून शुभम व कुणाल हे वर्धा मार्गावरील स्वास्थम हॉस्पिटलमध्ये व सुमित हा वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. आशा हॉस्पिटलमधील डॉ. लोकेश शाहू हे रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत असून ते त्याची १६ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. अमितेशकुमार यांनी पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना डॉक्टरला पकडण्याचे निर्देश दिले.

निलोत्पल यांचे विशेष पथक व कामठी पोलिसांनी सापळा रचला. रूग्णाचे नातेवाइक बनून पोलिसांनी डॉ. लोकेश यांच्याशी संपर्क साधला. लोकेश यांनी एक इंजेक्शन १६ हजार रुपयांना मिळेल, असे रूग्णाचे नातेवाइक बनलेल्या पोलिसाला सांगितले. त्याने पोलिसाला कामठीतील ड्रॅगन पॅलेस परिसरात बोलाविले. एक पोलिस रूग्णाचा नातेवाइक बनून तेथे गेला. लोकेश याच्याकडून रेमडेसिवीर घेतले. पोलिसांनी लोकेश व शुभम याला अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर जप्त करण्यात आले.

दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. रेमडेसिवीर कुणाल याने दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कुणाल याला अटक केली. त्याच्याकडून सात तर सुमित याच्याकडून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. या प्रकरणात एका परिचारिकेचीही भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती आहे. उशिरारात्री पोलिसांची कारवाई सुरू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

संपादन - अथर्व महांकाळ