नागपूर : रेशन धान्याचा काळाबाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration grain

नागपूर : रेशन धान्याचा काळाबाजार

नागपूर - सक्करदरा पोलिसांनी सरकारी रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या गोदामावर धाड टाकून ३ आरोपींना अटक केली. हिमांशू लखनराम शाहू (२५) रा. जुनी शुक्रवारी, विनोद लखनराम शाहू (२४) रा. धम्मदीपनगर आणि भोला मन्नू बावनकुळे (२५) रा. इंदिरामातानगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आयुर्वेदिक लेआऊटच्या एनआयटी संकुलातील एका गोदामातून रेशनचे धान्य पोत्यांमध्ये भरून बाजारात विकल्या जात असल्याची माहिती सक्करदरा ठाण्याचे बीट मार्शल यांना नियंत्रण कक्षातून मिळाली होती. बीट मार्शलने घटनास्थळावर पोहोचून तपासले असता ही माहिती खरी निघाली. त्यानंतर सक्करदरा पोलिसांनी गोदामावर धाड टाकली. अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळावर बोलावण्यात आले. गोदामाच्या झडतीत एफसीआय गोदामातून रेशनच्या धान्यासाठी पाठविण्यात आलेले गव्हाचे पोते उलटून साध्या पोत्यात भरण्यात येत असल्याचे आढळले.

पोत्यांवर सरकारी धान्याची मोहरही लागलेली होती. गोदामात पोलिसांना १७० कट्टे गहू मिळाला. तसेच प्लॅस्टिकची ६५ रिकामी पोतीही मिळाली. सोबतच सिलाई मशीन आणि २ वाहन असा एकूण ३.२२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी रेशनच्या धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे कबूल केले. त्यांना न्यायालयात हजर करून ४ मे पर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. ही कारवाई डीसीपी नुरुल हसन आणि एसीपी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात पोनि धनंजय पाटील, ऋषिकेश घाडगे, सपोनि विजय कसोधन, पोउपनि सचिन सावरकर, पोहवा चंद्रकांत कोडापे, रमेश पालथे, विद्याधर पवनीकर, पंकज रगतसिंगे, गोविंद देशमुख, कपिल राऊत, कुशल सोनकुसळे, अतुल माने, केवलराम भोगारे, ओमप्रकाश मते आणि हेमंत चकोले यांनी केली.