esakal | ‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

Builder commits suicide due to financial difficulties in Trimurtinagar Nagpur

निखिलेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सहा पानी चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. ‘मला त्रास देत आहेत. मी कंटाळलो आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. परंतु, माझा नाइलाज असल्याने मी आत्महत्या करीत आहे’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : आर्थिक विवंचनेतून एका बिल्डरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी त्रिमूर्तीनगरमधील सागर अपार्टमेंट येथे उघडकीस आली. निखिलेश सतीशचंद्र बुटे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलेश बुटे हे पत्नी भाग्यश्री व चार वर्षीय जुळ्या मुलांसह महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहायचे. सागर अपार्टमेंटमध्ये त्यांची आई व बहीण राहते. त्यांच्याकडे पाणी शुद्धीकरणासाठी (आरो) यंत्र बसविण्यात आले आहे. पाणी आणण्यासाठी ते आईकडे यायचे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते आईकडे आले. खोलीत गेल्यानंतर त्यांनी पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.

निखिलेश घरी न परतल्याने पत्नी भाग्यश्री तेथे आल्या. खोलीचा दरवाजा बंद होता. निखिलेश यांना आवाज दिला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने भाग्यश्री यांनी खोलीचा दरवाजा तोडला. निखिलेश हे लटकलेले दिसले. भाग्यश्री यांनी हंबरडा फोडला. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून निखिलेश यांचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

अधिक वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द

निखिलेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सहा पानी चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. ‘मला त्रास देत आहेत. मी कंटाळलो आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. परंतु, माझा नाइलाज असल्याने मी आत्महत्या करीत आहे’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे