
व्यावसायिक कुटुंबाला मिळतेय धमक्या
नागपूर - व्यवसायिकाच्या कुटुंबाला फरार आरोपीकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावरही मुख्य आरोपी फरार असून तो सातत्याने दुकानदार व्यावसायिकाला सतत जिवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब दहशतीत असून त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
आझाद अशोक शाहू (वय २८ रा. शिर्डीनगर, बहादुरा फाटा) असे पीडित दुकानदाराचे नाव आहे. आरोपींमध्ये रोशन गोपाल आंबटकर, शुभम बिल्हार, अनिकेत बाळबुधे, अतुल मोहनकर सर्व रा. बहादुरा फाटा, उमरेड रोड यांचा समावेश असून पोलिसांनी सध्या अनिकेतला अटक केली आहे. जखमींमध्ये आझाद शाहूसह पत्नी काजल आझाद शाहू (२६), वडील अशोक शाहू (४८) आणि आई रिता अशोक शाहू (४७) यांचा समावेश आहे.
आझादचे बहादुरा फाटा परिसरात रेस्टॉरेंट आहे. आझादचा उधारीच्या पैशांवरून रोशन आंबटकर याच्याशी जुना वाद आहे. एक-दोनदा त्यांच्यात भांडणही झाले आहे. याच वादातून गुरूपौर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ८.३० दरम्यान रोशनने ८ ते १० जणांच्या टोळक्यासह हातात हॉकी स्टिक आणि लाठ्या-काठ्या घेऊन आझादवर हल्ला केला. दुकानात घुसून सामानाची तोडफोड केली. विरोध केला असता जबर मारहाण केली. हे पाहून पत्नी काजल मध्यस्थीसाठी आली असता आरोपींनी तिच्याशीही गैरवर्तन केले.
शिवीगाळ करून मारहाण केली. यात तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. दरम्यान आई-वडील दुकानात आले. त्यांनी आरोपींना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. पीडित कुटुंबाने हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अनिकेतला अटक केली. इतर आरोपी अद्यापही मोकाट असून ते सतत जिवे मारण्याची धमकी देत आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीत जगत असल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले आहे. त्यांनी इतरही आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
Web Title: Business Family Is Receiving Threats Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..