
चंद्रपूर : बेपत्ता पती बेशुद्धावस्थेत आढळला; पत्नीचा मृत्यू
नेरी : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती हल्ल्यानंतर आढळून आला नाही. बुधवारी (ता. २५) केवाडा-गोंदेडा जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास टेकडीपासून काही अंतरावरील झुडपात बेपत्ता पती बेशुद्धावस्थेत आढळून आला. मीना जांभूळकर असे मृत पत्नीचे, तर विकास जांभूळकर असे जखमी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभूळकर हे पत्नी मीना जांभूळकर यांच्यासोबत मंगळवारी (ता. २४)केवाडा-गोंदेडा जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. दरम्यान, वाघाने या दाम्पत्यावर हल्ला चढविला. माहिती मिळताच गावकरी, वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळावर मीना जांभूळकर या मृतावस्थेत आढळून आल्या; परंतु विकास जांभूळकर हे आढळून आले नाही. दिवसभर शोध घेऊनही ते सापडले नाही. त्यामुळे आज पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. तेव्हा टेकडीपासून काही अंतरावरील एका झुडपात विकास जांभूळकर बेशुद्धावस्थेत आढळले.
वनविभाग म्हणतो, हल्ला वाघाचा नव्हे
जंगलात तेंदूपत्ता संकलन करताना हल्ल्यात जखमी झालेले विकास जांभूळकर आज आढळून आले. जांभूळकर यांनी ‘आमच्यावर वाघाने हल्ला केला’, असे पोलिस निरीक्षक मनोज गभणे, नायब तहसीलदार तुळसीदास कोवे यांना सांगितले. परंतु, वनविभागाने हा हल्ला वाघाने केला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मीना जांभूळकर यांचा मृतदेह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यात पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे. वनविभागाच्या या भूमिकेविरोधात जांभूळकर परिवाराने संताप व्यक्त करीत मृतदेहाची विटंबना केल्याची तक्रार चिमूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Web Title: Chandrapur Wife Found Dead Husband Missing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..