Nagpur News : 'मी बोललो तर अडचण होईल' चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Bawankule warning to Anil Deshmukh bail nagpur politics

Nagpur News : 'मी बोललो तर अडचण होईल' चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना इशारा

नागपूर : आपण समझोता केला असता तर अटक झाली नसती या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते जामिनावर बाहेर आले आहेत याचे भान ठेवावे, असे सांगून मी तोंड उघडले तर ते अडचणीत येतील, असा इशारा दिला.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी काय झाले ते मी सांगितले तर देशमुख यांना महागात पडेल, असेही बावनकुळे म्हणाले. देशमुख भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याची चर्चा त्यावेळी होती. देशमुख यांनी वर्धेच्या सभेत आपण भाजपसोबत समझोता केला नाही म्हणूण अटक करण्यात आल्याचे म्हटले होते.

विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिवसेनेला कौल दिला होता; मात्र शिवसेना-राष्ट्रवादीने षडयंत्र रचून महाविकास आघाडी स्थापन केली. जनतेच्या मतांशी धोका केला. म्हणून निसर्गानेच बदला घेऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यातील बहुतांश आमदारच नव्हे तर मंत्रीसुद्धा नाराज होते.

अनिल देशमुख खोटे बोलताहेत

शिवसेनेचे आमदार फोडून राष्ट्रवादीत आणण्याची योजना आखली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार आले. शरद पवार यांची साथ मिळत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे हिंमत करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला धोपटी बेलने घेऊन घरी बसावे लागेल, अशी भीती विरोधकांना वाटत होती.

म्हणूणच कुठल्याही परिस्थिती फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. त्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पद्धतशीरपणे आघाडी तयार केली. काँग्रेसकडे त्यांच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असेही बावनकुळे यांनी सांगितले.