चिखलदरा, पचमढीला पर्यटकांची पसंती

सलग चार दिवस सुट्या : फार्म हाऊस, रिसॉर्टही हाऊसफुल्ल
Chikhaldara Pachmarhi is preferred by tourists
Chikhaldara Pachmarhi is preferred by tourists

नागपूर - सलग चार दिवस सुटी आणि पावसामुळे घरात बंदिस्त झालेल्या नागरिकांनी यंदा पावसाळी पर्यटनाचा बेत आखला आहे. त्यामुळे चिखलदरा, बोधलकसा, रामटेक, पंचमढी येथील हॉटेल्स हाऊस फुल्ल झालेले आहेत. जंगल सफारी बंद असली तरी अनेकांनी निवांतपणासाठी जंगला शेजारील रिसोर्टला पसंती दिल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक पर्यटकांनी पश्चिम महाराष्ट्रात पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणाऱ्या जलधारांचा आनंद लुटण्यासाठी त्या भागात जाण्याचे नियोजन केले आहे.

पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. मात्र, पावसाळ्यात होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसामुळे शहराच्या शेजारील रिसॉर्टमध्येही गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, अनेकजण सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील फार्महाऊसला पसंती देताना दिसत आहेत. सध्या अशा फार्महाऊसचे बुकिंग जोरात आहेत.

सातपुड्याच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगानी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या अमरावती आणि मध्यप्रदेशातील जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणुकाही पर्वणीच असते. जून महिन्यात पाऊस सुरू झाला की पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगांकडे वळतात. मात्र काही दंगेखोर, दारुडे व अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागते. अशावेळी मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे व सुरक्षित ठिकाणी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील फार्महाऊस हे आता पावसाळी पर्यटनाचे नवीन हब झाले आहेत असेही पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

फार्महाऊसला पसंती

मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासमवेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फार्महाऊसला जाणे अनेकजण पसंत करतात. येथील निसर्गरम्य वातावरण, जोडीला स्विमिंगपुलची मज्जा, काही ठिकाणी असणारे वॉटर राईड, बगिच्यात फिरण्याचा आंनद, घरगुती, चुलीवरील व ग्रामीण भागातील लज्जतदार जेवण, कॅम्प फायरचा आंनद, भोवताली वाहणारे छोटे-मोठे ओढे यात मनसोक्त जलक्रीडा करण्याची मज्जा, शिवाय राहण्याची किंवा थांबण्याची उत्तम व्यवस्था असते. परिणामी सुरक्षित व निर्विघ्नपणे पावसाचा, भिजण्याचा व खाण्याचा आंनद घेत पावसाळी पर्यटन पार पडते.

चिखलदऱ्याचे हॉटेल हाऊसफुल्ल

सलग चार दिवस सुटी असल्याने विदर्भातील नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या पर्यटनाला चांगले दिवस आले आहे. ११ ते १७ तारखेपर्यंत येथील सर्वच हॉटेल हाऊस फुल्ल झाले आहेत. या दरम्यान अडीच ते तीन लाख पर्यटक येतील, यानिमित्ताने अनेकांना रोजगार मिळणार आहे, असे चावजी रिसोर्टचे संचालक प्रवीण चावजी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com