आकांक्षांपुढती गगन ठेंगणे! दुर्धर आजारावर मात करून तळपला रवी, बारावीत 91 टक्‍के!

ravi bang
ravi bang

नागपूर : महत्त्वाकांक्षा असेल तर व्यक्‍ती कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे रवी बंग. बारावीत शिकणारा मुलगा. गेली पाच-सहा वर्ष तो एका दुर्धर आजाराशी लढतो आहे, हे त्याची बारावीची टक्‍केवारी पाहून कोणालाही खरे वाटणार नाही. मात्र रवीने अशक्‍य ते शक्‍य करून समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

साडेचार वर्षापूर्वी दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रवी बंगने आजारावर मात करीत, सीबीएसई बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. दर दोन महिन्यातून उपचारासाठी मुंबईच्या वाऱ्या आणि सातत्याने आरोग्य जपण्यासाठी आलेल्या मर्यादा आणि नैराश्‍यानंतरही जिद्दीच्या भरवशावर स्वत:ला सावरुन अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी भारतीय विद्या भवन्स श्रीकृष्णनगर शाळेत आठव्या वर्गात असताना, रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होण्याचा दुर्धर आजार (आयटीपी) रवीला जडला. वैद्यकीय उपचारास सुरुवात झाली. याच परिस्थितीत त्याने दहावीमध्ये प्रवेश घेतला. प्रचंड मानसिक ताण आणि सातत्याने रूग्णालयात दाखल होण्याच्या प्रक्रियेमुळे मनस्थिती ठिक नव्हती. शिक्षण पूर्ण घेता येईल काय? या विचाराने त्याचे मन खिन्न व्हायचे. मात्र, या परिस्थितीत आई आणि वडीलांनी त्याला आजाराशी लढण्याचे बळ दिले. शिवाय शाळेतील शिक्षकांनीही त्याच्यातील जिद्द ओळखून त्याला शिकविण्यास सुरुवात केली. त्या बळातून त्याने मोठ्या हिमतीने दहावीमध्ये उत्तीर्ण होऊन दाखविले.

सविस्तर वाचा - नागपूर झेडपी अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह!

मात्र, लढाई अजून संपली नव्हती. अचानक एक दिवस अकरावीत असताना, त्याला वेल्लूर येथील ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिथे "बोनमॅरो'सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ती चिकित्सा या वयात करणे धोक्‍याचे असल्याने डॉक्‍टरांनी काही वर्ष थांबण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याने या आजाराशी झुंज देत शिक्षणाची जिद्द न सोडता बारावीचे वर्ष असल्याने आजार आणि अभ्यास दोन्ही गोष्टींचा मेळ जमवला. आजाराशी दोन हात करीत रवीने बारावीमध्ये 91.2 टक्के गुण घेत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. जिद्द असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण रोखू शकत नाही असे रवी सांगतो. रवीच्या या जिद्दीला आणि यशाला शाळेने सलाम केला असून प्राचार्या पी. निरुपमा शंकर यांनी रवीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com