esakal | बाबू होणार शिपाई, पदोन्नतीचा आनंद फक्त महिनाभरच

बोलून बातमी शोधा

nag zp

बाबू होणार शिपाई, पदोन्नतीचा आनंद फक्त महिनाभरच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषद प्रशासनाने शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत बाबू केले होते. परंतु, पदोन्नतीचा त्यांना औटघटकेचा ठरणार आहे. कारण काही कर्मचाऱ्यांना पुन्हा शिपाई पदावर पाठविले जाणार आहे. राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांना मूळ पदावर आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हा परिषदेतील परिचरांची गत अनेक वर्षांपासून पदोन्नती रखडली होती. त्यास शासनाचे वेळोवेळी निघणारे आदेश कारणीभूत असल्याचे सांगितले जात असले तरी पात्र परिचरांवर अन्याय होत होता. शेवटी ५ मार्च रोजी ५१ परिचरांची कनिष्ठ सहाय्यक (बाबू) म्हणून पदोन्नती दिली होती. मात्र राज्य शासनाने ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून सर्व प्रवर्गांना पदोन्नती देण्याचे आदेश काढले. त्यामुळे काहींच्या पदोन्नतीवर गंडांतर येणार असल्याचे समजते.गत काही वर्षांपासून पदोन्नतीचा विषय अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. शासनाने विरोधाभासी निर्णय घेतल्याने अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित होते. जिल्हा परिषदेतील परिचर गत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यासाठी ५ मार्च रोजी समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. त्यासाठी बिंदू नामावली, सेवा ज्येष्ठता यादी, परिचरांच्या पदोन्नतीसाठी शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेले बदल, न्यायालयीन प्रकरण, शैक्षणिक पात्रता आदी अडथळे पार करीत शेवटी परिचरांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात होती. परंतु, महिनाभरातच त्यांचा अपेक्षा भंग झाला होणार आहे.

पदोन्नतीबाबत शासनाने निर्णय काढला आहे. त्या अनुषंगाने अभ्यास करून आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याचीही दक्षता प्रशासन घेईल.
-डॉ.कमलकिशोर फुटाणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.