

नागपूर - सकाळच्या सुमारास शहरात झालेला हलका पाऊस व दिवसभर ढगांच्या दाटीमुळे वातावरण गारठून पाऱ्यात सहा अंशांची घट झाली. नागपूरकरांनी सोमवारी हिल स्टेशनचा अनुभव घेतला. दिवसभर सूर्यनारायणचे दर्शन झाले नाही. विदर्भात आणखी एक-दोन दिवस पाऊस व ढगाळ वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
हवामान विभागाने सोमवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो व ऑरेंज अलर्ट दिला होता. शहरात जोरदार पाऊस तर आला नाही, मात्र सकाळी काही भागांत हलक्या सरी अवश्य बरसल्या.
आकाशात दिवसभर ढगांची दाटी पाहायला मिळाली. त्यामुळे गारठा वाढून कमाल तापमानात मोठी घट झाली. रविवारच्या तुलनेत नागपूरच्या पाऱ्यात ५.६ अंशांची घट होऊन तापमान यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच २४.२ वर आले. तर विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद अकोला व अमरावती येथे २१ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.
चोवीस तासांत अकोल्यात पारा तब्बल ११ अंशांनी, तर अमरावतीत नऊ अंशांनी खाली आला. तसेच विदर्भात सर्वाधिक ३१ मिलिमीटर पावसाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.
पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे सोमवारी शहरात अगदी शिमला व उटीसारखे वातावरण पाहायला व अनुभवायला मिळाले. हवामान विभागाचा मंगळवारीही येलो अलर्ट असल्यामुळे नागपुरात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे.
थंडीच्या दिवसांत अवकाळी पाऊस नुकसानदायक
शहरात बरसलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी व बोचरे वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. हवामान विभागानुसार, अवकाळी पाऊस पुढील दोन दिवस तरी पिच्छा सोडणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील कपाशीसह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.