
Congress Agitation : नागपूर जीपीओ चौकात गाडी पेटवली
नागपूर - वारंवार चौकशीसाठी बोलावून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘ईडी’मार्फत त्रास दिला जात असल्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या चौकशीचा निषेध करीत संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी जीपीओ चौकात एक गाडी जाळून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
जीपीओ चौकात गाडी पेटवल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या चौकातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच तत्काळ गाडी विझवण्यासाठी धाव घेतली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, शिवाणी वडेट्टीवार प्रामुख्याने सहभागी झाले होते. मोदी सरकार सोनिया गांधी यांना विनाकारण त्रास देत आहे. जे प्रकरण संपले आहे. त्याकरिता वारंवार चौकशीसाठी बोलावल्या जात आहे. त्यांना दिवसभर कार्यालयात बसवून ठेवले जात आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा आमचा आक्रोश असल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले.
शिवाणी वडेट्टीवार म्हणाल्या, ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लावून त्रास दिला जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त आहेत. त्यातून गाडी जाळण्यात आली.
जीपीओ चौकात गाडी पेटवली
विरोधी पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी गाडी पेटवली आहे. युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रदीप सिंधव, महासचिव श्रीनिवास नालमवार, राष्ट्रीय सचिव अजित सिंग, तनवीर विद्रोही, आसिफ शेख, प्रणीत जांभुळे, पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, आकाश गुजर, सईस वारजूरकर, नीलेश खोबरागडे, वसीम खान, रौनक चौधरी, शिलज पांडे, संतोष खडसे, अनुराग भोयर, फजलूर कुरैशी, वैभव सरनायक, जयसेन सरदार, फिरोज शाह, रिझवान बेग आदींचा समावेश होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
Web Title: Congress Agitation Sonia Gandhi Ed Inquiry Nagpur Gpo Chowk Car Fire
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..