
नागपूर : वीज ग्राहकांची मागणी नसतानाही नवीन वीज मीटर जबरदस्तीने ग्राहकांच्या घरी लावले जात आहेत. आधीच वाढलेल्या वीज बिलाने ग्राहक मेटाकुटीला आले आहे. महागाईत कंबरडे मोडण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. महावितरणकडून स्मार्ट प्रिपेड आणि पोस्टपेड मीटर लावण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. मात्र, याला वीज ग्राहक संघटना आणि नागरिकांनी प्रचंड विरोध केला. यावर आता महावितरणने स्मार्ट खेळी करीत याला ‘टीओडी’ मीटर असे नाव दिले. हे मीटर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही परवानगी न घेता जबरीने लावले जात असल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे.सध्या घरी लागलेले वीज मीटर डिजिटल आहे. त्याबाबत नागरिकांच्या तांत्रिक तक्रारी नाहीत. मात्र, जास्त बिल येण्याच्या तक्रारी आहेत. महावितरणने युनिटनुसार वाढविलेले दरही याला कारणीभूत आहे.