esakal | चार पीएचसी सुरू, पण आठ महिन्यानंतरही कंत्राटदाराने पुरविले नाही कर्मचारी

बोलून बातमी शोधा

nag zp
चार पीएचसी सुरू, पण आठ महिन्यानंतरही कंत्राटदाराने पुरविले नाही कर्मचारी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन वर्षांनंतर जिल्ह्यात चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) सुरू करण्यात आली. पण, आठ महिन्यांचा कालावधी होत असताना यासाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटदाराने पुरविला नाही. त्यामुळे येथील उपचारावर परिणाम होत आहेत. केंद्र सुरू केल्यावरही त्याचा फारसा फायदा नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याने त्याला पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी व प्रशासनाकडून होत असल्याची टीका होत आहे. यावरून कोरोनाबाबत सत्ताधारी आणि प्रशासन किती गंभीर आहे, याची प्रचिती येते.

जिल्हा परिषदेअंतर्गत ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यात नव्याने चार केंद्रांची भर पडली. मौदा तालुक्यातील धानला, नरखेड तालुक्यातील भिष्णूर, कामठी तालुक्यातील भूगाव व उमरेड तालुक्यातील सालई ही चार केंद्रे नव्याने सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, ही चारही केंद्रे दीड वर्षापासून तयार होती. चारही बाजूंनी टीका झाल्यानंतर आता त्या सुरू करण्यात आल्या. कोणत्याही औपचारिक उद्‍घाटनाशिवाय त्या सुरू करण्यात आल्या. हे केंद्र रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्याचा देखावा करण्यात आला; परंतु प्रत्यक्षात अद्याप त्या सुरू झाल्यात नाही. कारण, येथे आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रावर १५ मनुष्यबळ निश्चित आहे. यातील ५ मनुष्यबळ शासकीय सेवेतील असून, १० कर्मचारी कंत्राटीच्या माध्यमातून भरायचे आहेत. हे कंत्राट पटले नामक कंत्राटदारास आठ महिन्यांपूर्वी देण्यात आले. परंतु, त्याच्याकडून मनुष्यबळच पुरविण्यात आले नाही. त्यामुळे पीएचसी सुरू होण्यास विलंब झाला. परंतु, त्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

फर्निचर नसल्याने केंद्र सुरू करता आले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने मनुष्यबळ दिले नाही. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून फर्निचरचे काम करण्यात आले. एक-दोन दिवसांत कंत्राटदाराकडून मनुष्यबळ येईल.
-डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
सत्ताधाऱ्यांचे कंत्राटदारांवर प्रेम आहे. त्यामुळेच कोणतीही कारवाई केली नाही. कोरोना असल्याने ही केंद्रे जानेवारीपूर्वीच सुरू झाली असती तर त्याचा फायदा झाला असता.
-व्यंकट कोरेमोरे, उपनेते, भाजप.