Nagpur : सत्ताधारी नगरसेवक पर्यटनावर, नागरिक वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

नागपूर : सत्ताधारी नगरसेवक पर्यटनावर, नागरिक वाऱ्यावर

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप सर्वच नगरसेवकांना गुप्तस्थळी पाठविण्यात येणार आहे. शनिवारी भाजपचे नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला ते शहरात येणार असून जवळपास तेरा दिवस प्रभागातील समस्या कोण सोडवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच नगरसेवक पर्यटनावर, नागरिक वाऱ्यावर असे चित्र पुढील दोन आठवडे दिसून येणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कॉंग्रेसकडून साडेतीन दशक भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी उमेदवारी दाखल करून रंगत निर्माण केली. डॉ. भोयर यांच्या उमेदवारीमुळे भाजपने सावध भूमिका घेतली. काल, बुधवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. या सर्व नगरसेवक, नगरसेविकांना एका एका गटात विभागण्यात आले आहे.

उत्तम सुविधा करता यावी यासाठी १५ ते २० नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. विधानसभानिहाय गट तयार करण्यात आले आहेत. भाजपने जोखीम न घेण्याचा निर्णय घेतल्याने या सर्वच नगरसेवकांना २७ नोव्हेंबरला सहलीला रवाना करण्यात येणार आहे. हे नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहेत.

हेही वाचा: नागपूरमधून भाजप नगरसेवकांना हलवणार; पाहा व्हिडीओ

विधानपरिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान असून सर्व नगरसेवक मतदानाच्या पूर्वसंध्येला अर्थात ९ डिसेंबरला शहरात येतील. त्यामुळे जवळपास तेरा दिवस नगरसेवक शहरात राहणार नाहीत. त्यामुळे या काळात स्वच्छता, सिवेज लाईनचे तुंबण्यासह इतर किरकोळ समस्या नागरिक कुणाकडे घेऊन जातील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिकारी, कर्मचारी सामान्य नागरिकांचे ऐकत नाही, ही वास्तविकता अनेकदा पुढे आली आहे. स्वच्छता, सिवेज लाईन दुरुस्तीची कामे नगरसेवकांच्या एका फोनवर होतात. एवढेच काही नगरसेवकांना फोन केला तरी नागरिकांची ही कामे होते. परंतु, पुढील १३ दिवस नगरसेवक संपर्काबाहेर राहणार आहे. फोनवरही त्यांच्याशी सामान्य नागरिकांचे बोलणे होणार नाही. त्यामुळे शहरातील ६५ टक्के प्रभागात समस्यांचे ढीग उभे राहण्याची शक्यता आहे.

पदाधिकारी होणार प्रति नगरसेवक?

नगरसेवकांच्या अनुपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रति नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांची नागरिकांच्या समस्या सोडविण्याची रंगीत तालीमही होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

नगरसेवक शहराबाहेर जाणार असल्याने प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबतही काळजी घेण्यात आली आहे. भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील. याशिवाय समस्यांबाबत तक्रारीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.

- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, महापालिका

loading image
go to top