प्रेमविवाहाचा करूण अंत; नवदाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू तर पतीचा संघर्ष सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

रात्री उशिरा दोघेही करीत होतो उलट्या; आईच्या लक्षात येईपर्यंत...

नागपूर : काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने मध्यरात्रीच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Couple attempted suicide) केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या उशिरा लक्षात आल्यानंतर दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू (Death of wife) झाला तर पती आयुसीयुमध्ये उपचार घेत आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आकांक्षा अश्‍विन कानेकर (२३, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्‍विन कानेकर असे अत्यव्यस्थ (Husband's struggle) असलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

आकांक्षा आणि अश्‍वीन हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते. अश्‍वीन हा एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे तर आकांक्षा ही पदवीचे शिक्षण घेत होती. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे त्यांनी घरच्यांच्या संमतीने काही दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केला. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. वृद्ध सासू-सासरे आणि हे पती-पत्नी असे चौघे जण एकत्र राहत होते.

दोघांमध्ये काही बाबींवरून मतभेद होते. त्यामुळे दोघांत नेहमी खटके उडायचे. परंतु, दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम असल्यामुळे ते सांभाळून घेत संसार करीत होते. शनिवारी रात्री दोघांत काहीतरी बिनसले. आकांक्षा हिने शनिवारी मध्यरात्रीनंतर धान्यात टाकायचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच अश्‍वीननेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

रात्री उशिरा दोघेही उलट्या करीत असल्यामुळे अश्‍वीनची आई झोपेतून उठली आणि तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने लगेच शेजाऱ्यांना आवाज देऊन दोघांना खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान, आकांक्षा हिचा मृत्यू झाला तर अश्‍वीनवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहे. दोघांनी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी पीएसआय शिंदे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Death of wife