
Crime news : एक्स गर्लफ्रेंडने मोबाइल परत केला नाही म्हणून केला चाकू हल्ला, नवा प्रियकर देखील जखमी
नागपूर : प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच, तिच्याशी संबंध न ठेवण्याचे सांगणाऱ्या युवकावर दुसऱ्या प्रियकराने हल्ला करीत, गंभीर जखमी केले. ही घटना हुडकेश्वर पोलिस हद्दीतील दिघोरी चौकातील उड्डाणपुलाखाली मंगळवारी (ता.३०) रात्री घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
स्नेहल रंजन घोडेस्वार (वय ३८ रा. न्यू शंकरनगर ,दिघोरी नाका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने सचिन बाबूदास महंत (वय ३० रा. तरोडी वाठोडा) याच्यावर हल्ला करून जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन महंत हा धरमपेठेतील गॅरेजमध्ये काम करतो. दीड वर्षांपासून त्याचे दिघोरी परिसरात राहणाऱ्या साधना (वय २७, नाव बदललेले) सोबत प्रेमसंबंध आहेत.
एक महिन्यापूर्वी सचिनने तिला नवीन मोबाइल दिला. दरम्यान करिष्माने सचिनसोबतचे संबंध संपुष्टात आणले. त्यानंतर ती स्नेहलच्या संपर्कात आली. ही बाब सचिनला माहिती झाली. त्याने साधनाशी संपर्क साधून तिला दिलेला मोबाईल परत मागितला.
मात्र, याबाबत तिने वाद घालून स्नेहलला माहिती दिली. त्यातून स्नेहलने रागात येऊन त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता.३०) रात्री १० वाजताच्या सुमारास सचिनच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याने साधनाला दिलेला मोबाइल परत घेण्यासाठी सचिनला दिघोरी चौकातील उड्डाणपुलाखाली ये असे सांगून बोलावून घेतले. त्यातून सचिन हा निलेश व आशिष नावाच्या मित्रांसह तेथे गेला. सचिनने स्नेहलला मोबाइल परत मागितला तसेच स्नेहलने सचिनवर चाकूने वार केले. मात्र, त्याच्या मित्रांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले.