
नागपूर : बँकेत नोकरी मिळाल्याचा आनंद दोन दिवसांत हिरावला, तरुणाचा मृत्यू
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व्यंकटेश सिटीच्या बी.विंग येथे टेरेसवरुन पडल्याने युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.३०) सांयकाळी घडली. शुभम महेंद्र डोये (वय ३०) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अभियांत्रिकी केले असून त्याची एका बॅंकेत नोकरीसाठी निवड झाली होती. यामुळे आई-वडिलांनी पेढेही वाटले होते. शनिवारी सांयकाळी साडेचारच्या सुमारास तो घरी आला. अंडे आणि वडिलांचे औषध आणले. ते खाली न देताच तो टेरेसवर गेला.
तिथे फोनवरुन बोलला. त्यानंतर आईशीही बोलला. मात्र, अचानक काही वेळातच तो खाली पडल्याचे महिलेला आढळले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुचे नागरिक तिथे आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. नागरिकांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शुभमचे वडील हे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्याला एक बहिण असून तिचेही गेल्यावर्षी लग्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांना अकस्मात मृत्युची नोंद केली.
नोकरी न लागल्याने तणावात ?
शुभमची काही दिवसांपूर्वी एका बॅंकेत नोकरी लागली. त्याचे सेलिब्रेशन म्हणून आई-वडिलांनी संपूर्ण विंगमध्ये पेढे वाटले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्याची नोकरी मिळाली नसल्याची माहिती समोर आली. मात्र, घरी हे सांगितल्यास आई-वडिलांचा हिरमोड होईल असा विचार त्याच्या मनात आल्याने तो तणावात असल्याची माहिती आहे. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती.