esakal | 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis
'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'
sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : राज्यात रेमडेसिव्हीर, बेड्स, ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचे जीव जात आहेत. लसीकरणाचा साठा देखील कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लस देण्यात यावी, अशी मागणी राज्याकडून करण्यात आली. त्यानंतर फक्त महाराष्ट्रच एकमेव राज्य नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आल्याचा आरोपही झाला. त्यातच आता वयाच्या अटीमध्ये बसूनसुद्धा अनेकजण लसीकरणापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा लस घेतानाच फोटो व्हायरल झाला. त्यामुळे आधीच राज्यात लशींचा तुटवडा आणि त्यातही वयात बसणाऱ्या नागरिकांना लस मिळत नाहीये. त्यात वयाची ४५ वर्ष पूर्ण न करताच देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी काय मिळाली? असा प्रश्न अनेकांनी ट्विटरवरून उपस्थित केला.

img

तन्मय फडणवीसच्या इंस्टाग्रामवरील व्हायरल झालेला फोटो

देवेंद्र फडणवीसांची काकू आणि भाजप नेत्या शोभा फडणवीस यांचा तन्मय हा नातू आहे. तो चंद्रपूरला राहत असून नागपुरात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. त्याने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नागपुरात नॅशनल कॅन्सर इंस्टाट्युट येथे लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाल्याचा फोटो शेअर करा. मात्र, त्यावरून ट्रोलिंग झाल्यानंतर तो फोटो डिलिट करण्यात आला. मात्र, अनेकांनी याचे स्क्रिनशॉट घेऊन ठेवल्याने फोटो व्हायरल झाला. त्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लसीकरणाचा दुसरा डोस घेतला असल्याचे लिहिले होते. अजूनपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना देखील दुसरा डोस देण्यात आला नाही. काही ज्येष्ठ नागरिकांचा देखील दुसरा डोस अजून बाकी आहे. त्यात तन्मयचा दुसरा डोस पूर्ण होणे म्हणजेच त्याला ज्येष्ठ नागरिकांच्या वयात बसवून तर लस दिली नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जाते.

तो आरोग्य कर्मचारी आहे का? - काँग्रेस

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करून प्रश्न उपस्थित केले. '४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?' अशा अनेक प्रश्नांची झोड महाराष्ट्र काँग्रेसने उठविली आहे.

...तो क्या हुआ आखिर वो फडण२० हैं? -

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील शायराना अंदाजात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे पुतणे नवाबजादे लस घेण्यासाठी आले. मात्र, त्यांना कोणीही वय विचारले नाही. वय ४५ नसले तर काय झाले? शेवटी तो फडणवीस आहे, अशी खरमरीत टीका सचिन सावंत यांनी ट्विट करून केली आहे.

आमच्या मुलांचा जीव फुकटात आलाय का? - नागरिक

आरोग्य कर्मचाऱी, फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. लशींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले होते. अशातच अनेकांचा दुसरा डोस देखील लांबला. लसीकरणामध्ये इतक्या समस्या असताना केवळ एक राजकीय नेत्याचा आणि विरोधी पक्षनेत्याचा पुतण्या असल्यामुळे तन्मयला लस देण्यात आली का? मग आमचे देखील मुलं बाहेर फिरतात, कामाला जातात त्यांना लस का देण्यात आली नाही? आमच्या मुलांचा जीव फुकटात आलाय का? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

'लसीकरण नियमाप्रमाणेच होणे गरजेचे आहे. पण, वयात बसत नसताना देवेंद्र फडणवीसांच्या २३ वर्षाच्या पुतण्याचे लसीकरण झाले. पण, ते लसीकरण कोणत्या नियमाच्या अधीन राहून करण्यात आले? तसेच ज्या लसीकरण केंद्रावरून ही लस देण्यात आली, त्यांनी कशी काय दिली? हे तपासून पाहणे गरजेचे आहे.'
- विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस