Dikshabhumi Agitation : नेतृत्वाशिवाय पेटले तीव्र आंदोलन

दीक्षाभूमीवरील सोमवारी पार्किंग बांधकामाविरोधात भीम अनुयायांनी कोणत्याही नेतृत्‍वाशिवाय तीव्र आंदोलन करून निर्माणाधीन बांधकामस्थळी तोडफोड आणि जाळपोळ केली.
Dikshabhumi Agitation
Dikshabhumi Agitationsakal
Updated on

नागपूर - दीक्षाभूमीवरील सोमवारी पार्किंग बांधकामाविरोधात भीम अनुयायांनी कोणत्याही नेतृत्‍वाशिवाय तीव्र आंदोलन करून निर्माणाधीन बांधकामस्थळी तोडफोड आणि जाळपोळ केली. या आंदोलनात समोरही अनुयायी आणि आंदोलन करणारेही अनुयायी होते. यावरून आंदोलन स्वयंस्फूर्त झाल्याचे दिसते.

दीक्षाभूमीवर जमलेल्या गर्दीत विभक्त असलेल्या रिपब्लिकन पक्षांचे कार्यकर्ते होते. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते , बहुजन समाज पक्षापासून तर विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांचे कार्यकर्ते होते. विहार-विहारांमधील कार्यकारिणीतील सदस्यांपासून तर चळवळीतील सारे कार्यकर्ता विखुरले असले तरी आज स्वयंस्फूर्तीने आज एकवटले होते.

ज्या दीक्षाभूमीने समाजाला भयमुक्त केले, बंधमुक्त केले, स्वाभिमान दिला तो समाज सारे विभक्तपण विसरून दीक्षाभूमीच्या संरक्षणासाठी बोधीवृक्षाच्या सावलीत संघटित होऊन समितीसह शासनाविरुद्ध विद्रोह करण्यास सज्ज झाल्याचे चित्र आज दिसून आले.

कृषी विभागाच्या जागेची मागणी

काही महिन्यांपासून दीक्षाभूमीवर भूमीगत पार्किंगचे बांधकाम सुरू आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्या जात होती. स्मारक समिती आणि सरकारकडे चौथ्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासाठी असलेली जागा देण्यात यावी, येथे वाहनतळ बनवण्यात यावे यासंदर्भातील निवेदन समितीला देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हे कारण देखील आंबेडकरी अनुयायांचा जनक्षोभ उसळण्यास कारणीभूत ठरले.

स्मारक समितीने दिले पत्र

जनक्षोभ तीव्र झाल्याने व दीक्षाभूमीवरील संताप बघता स्मारक समितीच्या सदस्यांनी तातडीने एनएमआरडीएच्या नावाने एक पत्र जारी केले. यात अनुयायांच्या भावना लक्षात घेता भूमीगत वाहनतळाचे बांधकाम १ जुलै २०२४ पासून तत्काळ प्रभावाने बंद करीत आहोत. या निर्णयाचे पत्र शासनास देऊ असेही स्पष्ट केले. स्मारक समिती सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. डी.जी.दाभाडे, एन.आर. सुटे यांची पत्रावर स्वाक्षरी होती.

इतर विकासकामांचा आराखडा

  • मुख्य स्मारक्या चारही प्रवेशद्वारांचे नूतनीकरण

  • २० फूट रुंद व ६६ फूट उंच चार तोरणद्वार

  • स्मारका सभोवती दगडी परिक्रमा व दगडी पदपथ

  • स्मारकाच्या चारही बाजूला हिरवेगार प्लांटर

  • ११,३१६ चौरस फुटांचे व्याख्यान केंद्र

  • ५,४६६ चौरस फुटांचे खुले सभागृह

  • ६६ फूट लांब आणि ५४ फूट रुंद १५ फूट उंचीचा खुला मंच

  • दीक्षाभूमी परिसराभोवती दगडी सुरक्षा भिंत

  • ३३ फूट रुंद व ३० फूट उंचीचे दोन मुख्य प्रवेशद्वार.

  • सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली व पोलिस नियंत्रण कक्ष

  • ५ लाख ११ हजार ७४२ चौरस फुटांचे हरितक्षेत्रासह विद्युतीकरण, सौरऊर्जा यंत्रणा व मलनिस:रण केंद्र.

  • ३७ फूट उंचचे अशोक स्तंभ

पार्किंगमधील विकास आराखडा

पहिल्या टप्प्यातील कार्य

स्मारकाच्या दक्षिण दिशेला भूमिगत पार्किंगचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा दावा.

१४६ चार चाकी कार आणि ९०२ सायकल व दुचाकी वाहनाच्या पार्किंगची क्षमता.

प्रसाधने, अनामत कक्ष (अनुयायांसाठी लॉकरची सुविधा), प्रथमोपचार कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा होती. भूमिगत वाहनतळाच्या छतावर बसण्याची जागा. सभोवताल शोभेची झाडे व पादचारी मार्ग तयार होणार होता.

विनामागणी काम - अॅड. प्रकाश आंबेडकर

दीक्षाभूमीवर कुठल्याही प्रकारच्या वाहनतळाची मागणी नव्हती. त्यानंतरही समितीकडून हे काम सुरू करण्यात आले. अनुयायांच्या भावनांचा अनादर करण्यात आला. त्यामुळे अनुयायांना ही भूमिका घ्यावी लागली. या भूमिकेचे आपण समर्थन करीत असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

राजकारण कराल तर खबरदार!

नागपूर - दीक्षाभूमीवरील आंबेडकरी अनुयायांच्या उद्रेकानंतर राज्य शासन व राजकीय नेत्यांनी तात्पुरती मलमपट्टी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सरकारच नव्हे तर राजकीय पक्षातील नेत्यांना या विषयावरून राजकारण कराल तर खबरदार असा इशारा आंबेडकरी अनुयायांनी आज दीक्षाभूमीतून दिला.

दीक्षाभूमीच्या विकासाला आणि सौंदयींकरणाला विरोध नाही. मात्र, येथील बांधकामांसंदर्भातील माहिती अनुयायांना हवी आहे, असे सांगत दीक्षाभूमीची मालक जगभरातील आंबेडकरी जनता आहे, असे थेट बोल आंदोलकांनी सुनावले. दीक्षाभूमीवरील सोमवारच्या घटनेनंतर अनुयायांनी संतप्त अशी भूमिका घेतली आहे. पुरूष व महिला अशा हजारोंच्या संख्येने दीक्षाभूमीवर अनुयायी आले होते. धम्मदीक्षा सोहळ्याच्या वर्धापनदिनी लाखोंच्या संख्येत अनुयायी येतात.

मात्र चुकीचे बांधकाम सुरू आहे, असा संदेश राज्यात पसरला. यामुळे नागपूरच नव्हे तर राज्यभरातून अनुयायी आले होते. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. शासनासोबतच आंबेडकरी नेते, राजकीय मंडळी व स्मारक समितीच्या सदस्यांवरही असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अनुयायांनी केले पैसे गोळा

दीक्षाभूमीत केलेला खड्डा बुजविण्यासाठी अनुयायांनी पैसे गोळा केले. सरकार खड्डा बुजवत नसेल तर अनुयायी निधी उभारून खड्डा बुजवेल. सोमवारीच तरूण अनुयायांनी पैसे गोळा केले. दीक्षाभूमीवर आलेल्या प्रत्येक अनुयायांनी त्यांच्या स्वेच्छेने निधी द्यावा अशी विनंती करीत निधी गोळा केला जात होता.

जनभावनेचा आदर व्हावा - वडेट्टीवार

विकास कामांबाबत जनभावनेचा आदर होण्याची गरज आहे. सरकार निधी देत असते. परंतु, इथे तसे झाले नाही. अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी थांबतील कुठे? हा प्रश्न आहे. संपूर्ण परिसर खोदून ठेवला आहे. हा पैसे कमविण्याचा धंदा आहे. स्मारकाला धोका झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे विनाविलंब काम थांबवावे. खड्डा तातडीने बुजवावा. अन्यथा, अनुयायीच बुझवतील. यासंदर्भात मंगळवारी सभागृहात मुद्दा मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

पावणेचार एकरची जागा दीक्षाभूमीला द्या - डॉ. नितीन राऊत

दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंग झाल्यास दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असले तर या परिसरात पुढे पावणेचार एकर जागा आहे. ती जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी. या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाऊ शकते.असे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले.

जनतेच्या आस्थेचा विषय - नाना पटोले

दीक्षाभूमी ही अनुयायांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे अनुयायी व जनतेचा भावनांचा आदर करूनच विकासकामे करण्याची गरज आहे. या कामासंदर्भात अनुयायांना विश्वासात घेतल्या गेले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.