Diwali Festival : दिवाळी खरेदीचा विक्रम मोडणार

शहरात एक हजार कोटींच्या उलाढालीची शक्यता; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
Diwali Festival Shopping
Diwali Festival Shopping

नागपूर : दिवाळी हा मांगल्याचा आणि समृद्धीचा सण आहे. दिवाळीच्या मुहुर्ताला आपल्याकडे सोने, चांदी, वाहने किंवा कोणतीही नवीन वस्तु खरेदी करण्याची प्रथा आहे. तसेच नागरिकांच्या गरजा वाढताना दिसत आहेत. यावर्षी दिवाळीचा मुहूर्त साधून नागपूरकर मनसोक्त खरेदीचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे दिवाळीत शहरातील बाजारपेठांमध्ये १००० कोटीहून अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

फटाके, मिठाई, नवीन कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशिन अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांचीही झुंबड उडाली आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा प्रथम निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर बाजारात उत्साह निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळणार आहे. दिवाळीत उत्साहाने टोक गाठले असून, ग्राहकही मोठ्या संख्येने बाजाराकडे वळत आहेत. दुकाने वस्तूंनी ओसंडून वाहत आहेत आणि ग्राहकही खरेदीचा उत्साह दाखवत आहेत.

खरेदीच्या या उत्सवात श्रीमंतांसह सर्वसामान्यही उत्साहाने सहभागी झाले आहेत. भारतात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. पण या सगळ्यात दिवाळीतला उत्साह आणि होणारी उलाढाल इतर सणांवर मात करणारी असते. यंदा वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरश कंबरडे मोडले आहे.

वर्षातल्या पहिल्या महिन्यापासून सुरू झालेल्या भाववाढीची मालिका अद्याप कायम आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फारसा उत्साह जाणवणार नाही, असे भाकीत अर्थतज्ञांनी वर्तविले होते. मात्र सध्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांपासून गर्भश्रीमतांनी मोठी खरेदी केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर मुक्त वातावरणात दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळे यंदा दीडपट अधिक व्यवसाय होईल. अंदाजे एक हजार कोटीची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

-अश्विन मेहाडिया,अध्यक्ष,नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही सोने खरेदीचा उत्साह ग्राहकांमध्ये आहे. पूर्वी सोन्याचे क्वाईन घेण्यावर अधिक भर होता, आता त्यापद्धतीत बदल झालेला आहे. ग्राहकांकडून दररोजच्या वापरातील सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोनसाखळी खरेदीवर भर दिला जात आहे. गुंतवणुकीसोबतच परिधान करता येणाऱ्या दागिन्यांच्या खरेदीकडे कल आहे.

-राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com