
नागपूर : बांबूच्या कंगव्याने करा ‘हेअर स्टाईल’
नागपूर - कारागिरांची ओळख त्याच्यात असलेल्या कलागुणांनी होते. मध्य प्रदेशातील सिहोरा येथील एका कारागिराने चक्क बांबू निर्मित डिझाईनदार कंगवा तयार करून स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेला डिझाईनदार कंगवा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्याचे नाव आहे राकेश शुक्ला. ते जबलपूर जवळील सिहोराचा रहिवासी आहे. बांबूपासून हस्तकलेने विविध वस्तू तयार करण्यात ते पटाईत आहे. हस्तकला हा त्यांचा छंद आहे. सर्वात आधी त्याने बांबूपासून ‘टूथ ब्रश’ तयार केला. सुरुवातीला एक-दोन ब्रश तयार केल्यानंतर लोकांना दाखविले. याला बऱ्याच लोकांनी पसंती दर्शविली. प्लास्टिकच्या ब्रशपेक्षा अशा नैसर्गिक ब्रशचा वापर जीवनात व्हावा, असा सल्ला लोकांनी दिला. मग काय मेहनत घेऊन हस्तनिर्मित ब्रश त्यांनी बनवणे सुरू केले. अतिशय मेहनतीचे व वेळ खाऊ हे काम असल्याने राकेश शुक्ला थांबले नाही. त्यांनी छंद जोपासत कला सुरुच ठेवली.
प्लास्टिकच्या ब्रश सारखाच कंगवा सुद्धा आपण बांबूपासून तयार करू शकतो असा, विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. सुरुवातीला त्यांनी साधा कंगवा तयार केला. हुबेहुब प्लास्टिकच्या कंगव्या सारखाच त्याचा वापर होऊ शकतो. असे त्यांच्या लक्षात आले. नागरिकांकडून सुद्धा बांबू कंगव्याला पसंती मिळाली. नंतर कंगवा तयार करायचा मात्र, तो ‘डिझाईनदार’ असे ठरविले. अतिशय बारीक काम असलेला डिझाईनदार कंगवा त्याने तयार केला. असा कंगवा तयार करायला खूप वेळ लागतो. शिवाय यात मेहनत सुद्धा अधिक असते. त्यामुळे किंचितच असे कंगवे बनवितो. मात्र, हे कंगवे बघितल्यानंतर लोकांची पावले आपोआप थबकतात. हातात घेऊन लोकं ‘हेअर स्टाइल करतात. त्यांना हुबेहुब प्लास्टिकच्या कंगव्या सारखेच वाटते. राकेश शुक्ला यांनी छंदाला व्यवसायाची जोड दिली. साडेआठशे रुपयापर्यंत असलेला हा कंगवा लोकं हौसेखातीर घेऊन जात असल्याचे राकेश शुक्ला यांनी नागपूरला आले असता सांगितले.
भूतानमध्ये लोकांचा कुतूहल
ईको फ्रेंडली व नैसर्गिकरीत्या असलेला हा बांबूचा डिझाईनदार कंगवा भूतानच्या नागरिकांना फार आवडला. हस्तकला प्रदर्शनाच्या निमित्ताने राकेश शुक्ला भूतानमध्ये गेले असता तेथील लोकांनी खूप बारकाईने कंगव्याची चौकशी केली. तेथील बऱ्याच नागरिकांनी हा कंगवा हौसेखातर विकत घेतला.
डिझाईनदार कंगवा हस्तनिर्मित आहे. त्यामुळे बराच वेळ बनवायला लागतो. खूप मेहनतीचे काम आहे. हा आपला छंद होता. याला सध्या व्यवसायाची जोड देण्याचा प्रयत्न करीत आहे. विदेशातूनही मागणी आहे.
- राकेश शुक्ला, कारागीर.
Web Title: Do Hairstyle With Bamboo Comb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..