
युक्रेन रशिया या युद्धाचा रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ नये व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये.
खतांचा तुटवडा नको, नियोजन करा - डॉ. नितीन राऊत
नागपूर - युक्रेन रशिया (Ukrain-Russia War) या युद्धाचा रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) उपलब्धतेवर परिणाम होऊ नये व त्याचा फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसू नये, यासाठी उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याची सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केली.
बैठकीमध्ये सर्वप्रथम हवामान खात्याचा अंदाज वर्तविण्यात आला. केंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस राहणार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पीक पेऱ्याचे नियोजन करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. नागपूर जिल्ह्यात ४ लाख, ७४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रांमध्ये विविध पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस लागवडीखाली येते.
गेल्यावर्षी दोन लक्ष हेक्टरवर पऱ्हाटीची लागवड करण्यात आली होती. त्याखालोखाल एक लक्ष दहा हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीखाली होते. त्यापाठोपाठ भाताची व तुरीची लागवड खरीप हंगामात केली जाते. त्यामुळे यावर्षी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील पीक लागवडी बाबत उद्दिष्ट लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत करण्यात आल्या. खरिपासाठी कर्ज वाटप करताना बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत तालुका स्तरावर विमा कंपन्यांचे कार्यालय उघडण्यात आले आहे. या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना आपले कार्यालय कुठे आहे, त्याची माहिती द्यावी. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीच्या संपर्क व्यवस्थेसाठी हा समन्वय ठेवावा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनाही याची माहिती द्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
आमदार आशिष जायस्वाल व राजू पारवे यांनी यावेळी गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी आलेल्या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाले नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. प्रस्तावाबाबत यावेळी चौकशी करण्यात आली. तसेच यासंदर्भात तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे स्पष्ट केले.
Web Title: Dont Be Short Of Fertilizers Do Plan Dr Nitin Raut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..