
नागपूर : डोक्यावर चटणी-भाकरीचं गाठोडं, अंगावर फाटक्या लक्तरांचा बाज घेऊन हजारो बाया-बापडी, म्हातारे बाबासाहेबांच्या पावलांमागे तळ्याच्या दिशेनं निघाले. महाड तळ्यावर पोचताच सभोवताल जनसागर पसरला होता. तळ्यातील पाण्यात सारे प्रतिमा बघू शकत होते; मात्र पाण्याला स्पर्श करू शकत नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या परिषदेत ठराव घेतल्यानुसार महाडच्या तळ्यावरील शहाबहिरी घाटाच्या पायऱ्या उतरले. साऱ्यांच्या नजरा बाबासाहेबांवर होत्या. बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी हातात घेतले आणि हजारो अस्पृश्य अनुयायांनी त्यांचे अनुकरण केले. एकाच दिवशी हजारो हातांच्या स्पर्शाने महाडच्या तळ्यातील पाणी चवदार झाले. २० मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास महाडचा संगर घडला.