नागपूर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या नागपूर येथे जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील कानाकोपऱ्यातील वस्त्या महामानवाच्या जयंतीच्या जल्लोषात न्हाऊन निघाल्या.
रस्त्या-रस्त्यावरून ‘जयभीम’चा जयघोष करीत दीक्षाभूमी आणि संविधान चौकाकडे निळ्या पाखरांचे थवे जात होते. कुठे बाईक रॅली तर कुठे सकाळी आणि सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. उपराजधानीचे वातावरण ‘भीममय’ झाले होते.
बाबासाहेबांच्य जयंतीला विविध वस्त्यांमधील घरांचे दार, वस्त्यांचे गेट अन् रस्ते तोरण, पताका, पंचशील ध्वज आणि निळ्या कमानींनी सजले होते. त्याचप्रमाणे वस्त्या-वस्त्यांमध्ये रोषणाईचा करण्यात आला. जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौकातील जल्लोषापासून उत्साह संचारला होता.
सोमवारी सकाळपासूनच अनुयायांची पावले संविधान चौक व पवित्र दीक्षाभूमीकडे वळली. पांढरे शुभ्र वस्त्र, निळ्या पताका, पंचशील ध्वज घेऊन विविध भागातून मिरवणुका निघाल्या. काहींनी तर भरदुपारी उन्हामध्ये बाईक रॅली काढली. तर कुठे भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.
महामानवापुढे अनुयायी झाले नतमस्तक
तत्त्पूर्वी दीक्षाभूमीत भिक्खू संघाच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवर बुद्धवंदना घेण्यात आली. तर संविधान चौकात अनुयायी व बहुजन विचारक, आबालवृद्धांच्या गर्दीने उत्साहाला भरते आले होते. सकाळपासून शेकडो सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्था, संघटनांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. संघटनांचे कार्यकर्ते, वस्त्यांमधील रॅली संविधान चौकात पोहोचल्या.
सोशल मीडियावर भीमजयंतीच्या शुभेच्छांचा पाऊस
रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमी उपासक, उपासिकांच्या उपस्थितीने फुलून गेली होती. शहरातील समस्त वस्त्यांमध्ये जणू भीमजयंतीचा उत्साह संचारला होता. भीम पहाटने सकाळची सुरुवात झाली. वस्त्यांमध्ये सामूहिक भोजन, भीमगीतांचे कार्यक्रम, भोजनदान झाले.
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत तरुणार्इंनी केलेले नृत्य, नागरिकांनी मिठाई वाटून एकमेकांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. निळ्या कमानी, तोरण, पताकांनी शहरातील वस्त्या सजल्या होत्या. जणू संपूर्ण शहरच भीममय झाल्याचे पहायला मिळाले.
हजारो अनुयायी प्रेरणाभूमीवर दाखल
दिवसभर हजारो अनुयायांनी प्रेरणाभूमीवर नतमस्तक होत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीतर्फे समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, डॉ.सुधीर फुलझेले यांनी तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. समितीचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे सैनिक यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष, उत्तर नागपूर
भारतीय जनता पक्ष, उत्तर नागपूरतर्फे यादवनगर, भीम चौक येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते भोलानाथ शहारे, प्रचार प्रसार प्रमुख अविनाश धमगाये, अनुसूचित आघाडीचे नेते नेताजी गजभिये, प्रभाग संयोजक चंद्रकांत सदावर्ते, स्वच्छ भारतचे उपेंद्र वालदे, अजिंक्य शहारे, संजय शेंडे, मुकुल राऊत, संतोष बढेल, गुरमित सिंग बावरी, शीला मासुरकर, रहांगडाले, तडस, बोस, आनंद अंबाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.