Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन दिवस बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच बुधवारी पुन्हा हादरली.
earthquake again in nagpur district ground shook for the fourth time week citizens afraid
earthquake again in nagpur district ground shook for the fourth time week citizens afraidSakal

नागपूर : गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन दिवस बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच बुधवारी पुन्हा हादरली. यावेळी भूकंपाचे केंद्र कामठी व कोराडी परिसर होते. सौम्य स्वरूपाच्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.४ इतकी नोंदविण्यात आली. नागपूर जिल्ह्यामध्ये या आठवड्यात बसलेला हा चौथा भूकंपाचा हादरा होता.

भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाचे धक्के कामठी व कोराडीसह दिघोरी, कापसी बुजूर्ग, महालगाव व लिहिगाव या गावांमध्ये जाणवले.

रिश्टर स्केलवर २.४ इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पाच किलोमीटर आत होते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातही या भूकंपाची नोंद करण्यात आली. यापूर्वीच्या तिन्ही भूकंपाप्रमाणे हाही भूकंप सौम्य स्वरूपाचाच होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, तसेच कुणाला कंपनही जाणवले नाही.

नागरिकांनी घाबरू नये : डॉ. इटनकर

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भुकंपाची नोंद होत आहे. भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानुसार, जिल्ह्यातील हे भुकंप अतिशय सौम्य प्रकारचे आहेत. यातून कोणतीही हानी होणार नाही.

नागपूर झोन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची काहीच गरज नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून थोडीफार खबरदारी अवश्य घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना केले आहे. वारंवार होत असलेल्या भुकंपाच्या नोंदीमुळे संपूर्ण जिल्ह्याची सुक्ष्म भुकंप तपासणी व अभ्यास करण्यासाठी भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आल्याचेही डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.

खाणीतील ब्लास्टिंगमुळेच धक्के

प्रा. चोपणे यांच्या मते, नागपूर परिसरात चौथ्यांदा भूकंपाचे हादरे बसणे, ही निश्चितच नैसर्गिक प्रक्रिया नाही. पहिल्यांदा जमीन हादरली, त्यावेळी हा भूकंप वाटला होता. मात्र वारंवार धक्के बसणे, अजिबात भूकंप वाटत नाही.

खाणीतील ब्लास्टिंगमुळेच जमिनीला धक्के बसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळकाढू धोरण न अवलंबिता तातडीने या भागात तहसीलदार किंवा अन्य महसूल अधिकाऱ्यांना पाठवून यामागचे नेमके कारण शोधून काढण्याची गरज आहे. तसेच जीवितहानी व संभाव्य धोके लक्षात घेता खदानीतील ब्लास्टिंग तात्पुरते बंद करावे, असेही ते म्हणाले.

  • ८ मे २०२४ ३.५९ वाजता २.४ रिश्टर स्केल कामठी/कोराडी

  • ५ मे २०२४ २.२८ वाजता २.७ रिश्टर स्केल उमरेड तालुका

  • ४ मे २०२४ २.२४ वाजता २.४ रिश्टर स्केल कुही तालुका

  • ३ मे २०२४ ३.११ वाजता २.५ रिश्टर स्केल पारशिवनी/हिंगणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com