esakal | अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा; प्रकृती बिघडली
sakal

बोलून बातमी शोधा

 शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे गाथाची अशी अवस्था झाली.

अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

sakal_logo
By
सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : शिकवणी वर्गात उशिरा का आली म्हणून वय वर्षे नऊ असलेल्या चिमुकलीला तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा संतापजनक प्रकार भिवापूर तालुक्यातील महालगाव येथे उघडकीस आला. या कठोर शिक्षेमुळे मुलीची प्रकृती बिघडली आहे. ही घटना ६ जुलैला घडली. संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Education-Punish-the-girl-health-deteriorated-Crime-filed-against-the-teacher-nad86)

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी गाथा कपिल मूल चौथ्या वर्गात शिकते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाईन वर्गात मुलांना समजत नसल्याने महालगाव येथील शिक्षक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन सात शिक्षक मित्रांची नियुक्ती केली आणि त्यांना प्रतिशिक्षक दोन हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. हे शिक्षक आपापल्या घरी वर्ग घ्यायचे.

हेही वाचा: पॉर्न सर्चिंग : पुणे पहिल्या, नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ग चारची जबाबदारी आंचल कोकाटे या शिक्षक मैत्रिणीवर होती. गाथा शिकवणी वर्गात उशिरा पोहोचल्याने कोकाटे हिने तिला तब्बल २०० उठाबशा मारण्याची शिक्षा ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर झाल्याचे मुलीचे काका पंकज मूल यांनी सांगितले.

याबाबत बेला येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांना विचारणा केली असता, त्यांनी आचल कोकाटे (वय २१, रा. महालगाव), राजेश चौधरी (वय ४०, रा. नागपूर), पांडुरंग बुचे यांच्यावर गुन्हा नोंदवला. चौकशीअंती दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती वाघोडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षा देणे अशोभनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. चौकशी सुरू असून, अहवाल आल्यानंतर कारवाई करू.
- भारती पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती, नागपूर

हेही वाचा: वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

एवढ्या लहान विद्यार्थिनीला शिक्षा करणे चुकीचे आहे. प्रकरणाची चौकशी गटशिक्षणाधिकारी करीत आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- हिमाणे, खंडविकास अधिकारी, भिवापूर
लहान मुलीशी झालेला प्रकार अशोभनीय आहे. या प्रकरणात मी चौकशी अधिकारी असून, चौकशी सुरू आहे. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन शिक्षक मित्र नेमले होते. शिक्षक, मुलीच्या मैत्रिणी आणि विद्यार्थिनीची साक्ष घ्यायची आहेत. त्यानंतर अहवाल सादर करू. दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
- विजय कोकोडे गटशिक्षण अधिकारी भिवापूर

(Education-Punish-the-girl-health-deteriorated-Crime-filed-against-the-teacher-nad86)

loading image
go to top