नागपूर ग्रामीणमध्ये बत्ती गुल; शहर भारनियमनातून मुक्त

राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत विजेची उपलब्धता कमी आहे. कोळसा अभावी वीजनिर्मितीवरही परिणाम झालेला आहे.
load shedding
load shedding sakal
Summary

राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत विजेची उपलब्धता कमी आहे. कोळसा अभावी वीजनिर्मितीवरही परिणाम झालेला आहे.

नागपूर - राज्यात विजेची मागणी (Electricity Demand) वाढल्याने महावितरणने भारनियमन (Load Shedding) करण्यास सुरवात केली आहे. विदर्भातील (Vidarbha) १३०० फिटरपैकी २०० फिडरवर भारनियमन करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) दहा फिडरचा त्यात समावेश आहे. यामुळे शहर वगळता ग्रामीण भागातील अंदाजे तीन हजारच्या जवळपास ग्राहकांना विविध वेळात भारनियमनाचा फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत विजेची उपलब्धता कमी आहे. कोळसा अभावी वीजनिर्मितीवरही परिणाम झालेला आहे. सद्यःस्थितीत सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणच्या दाव्यानुसार विजेची वाढती मागणी आणि उपलब्धता यांचा ताळमेळ कायम राखण्यासाठी जी-१,जी-२ व जी-३ या गटात महाराष्ट्र राज्य विद्यूत नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार तात्पुरते व टप्याटप्याने भारनियमन करण्यात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

गुजरात, आंध्रप्रदेशात वीज कपात

वीजटंचाईमुळे शेजारच्या आंध्रप्रदेशमध्ये औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के वीजकपात सुरु केली आहे. तर गुजरातमध्येही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येत आहे. तसेच इतर राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांच्या वीजपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येत आहे.

अशी होते गट निश्चिती?

विशिष्ट भागाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला फिडर संबोधले जाते. वीजचोरीचे प्रमाण आणि वसुलीच्या प्रमाणानुसार फिडरची गटांमध्ये विभागणी केली जाते. ‘जी‘ हा गट सर्वात शेवटचा आहे. या गटातही तीन उपगट तयार केले आहे. जी-१ भागात वाणिज्यिक व वितरण हानीचे प्रमाण ५८ ते ६६ टक्के असते. जी-२ भागात वाणिज्यिक व वितरण हानीचे प्रमाण ६६ ते ७४ टक्के तर जी-३ गटात वाणिज्यिक व वितरण हानीचे प्रमाण ७४ पेक्षा अधिक असते. भारनियमन एकाच वेळी न करता टप्याटप्याने करण्यात येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. एका फीडरवर अंदाजे अडीचशे ते तिनशे ग्राहक असतात.

- नागपूर परिमंडळातील एकूण ७१२ फीडरपैकी जी-१, जी-२ व जी-३ गटात १० फीडर आहेत.

- विदर्भातील सुमारे १३०० फीडरपैकी केवळ २०० फीडर जी-१,जी-२ व जी-३ या गटात आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com