बोगस बियाण्यांत शेतकरी फसला

बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. सरकारी प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत राज्यात सहा वर्षांत तब्बल २३ हजार ६६८ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आलेत
बोगस बियाण्यांत शेतकरी फसला

वेलतूर : बोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. सरकारी प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत राज्यात सहा वर्षांत तब्बल २३ हजार ६६८ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आलेत. गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा असल्याची माहिती माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत उघड झाली असून कायदा शेतकरीवर्गाच्या बाजूने की बियाणे कंपन्यांच्या बाजूने असा सवाल उभा राहिला आहे.

कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक

पळसे गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी ३ ऑक्टोबर २०१९ ला एका कंपनीचं फ्लॉवरचे बियाणे घेतले होते. मात्र अर्धा एकरवरच्या फ्लॉवरला तीन महिन्यांनंतर कंद न आल्याने फसवणूक झाल्याचं, गायधनी यांच्या लक्षात आले. या प्रकरणी न्यायाबाबत सरकारी यंत्रणेकडून त्यांची निराशा झाली. उलट देणेकऱ्यांचा तगादा सुरू झाला. त्यामुळे भरपाई मिळावी आणि संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया गायधनींनी दिली आहे.

२३ हजारांवर नमुने अप्रमाणित

गायधनी यांच्याप्रमाणेच राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचीही अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. त्याचा अहवाल कृषी खात्याच्या गुणवत्ता विभागाने सरकारला सादर केला आहे. त्यात राज्यात २०१२ पासून २३ हजार ६६८ अप्रमाणित नमुने आढळून आल्याचे उघड झाले आहे. मात्र बोगस बियाणे आणि औषधांबाबत कारवाईचे अधिकार नसल्याने, राज्यातल्या कृषी विभागाचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे असे कुठे घडत असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करू इतकेच आश्वासन पदाधिकारी व अधिकारी देत असतात.

विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक

हैदराबाद, मुंबई, नाशिक शहरांत बोगस बियाणांचे रॅकेट सुरू असल्याचं आतापर्यंतच्या अनेक कारवायांतून उघड झाले आहे. आता त्याचे कंपन्या विदर्भातील शेतकरीवर्गाला टार्गेट करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. नाही तर बोगस बियाणांमुळे निराशेतून बळीराजा एखादे टोकाचं पाऊल उचलू शकतो. बोगस बियाणे विक्री व पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे थांबले पाहिजे. कुठे उभे वा कापलेले पीक पेटवून देणे, कोठे त्याला नुकसान करणे तर कोठे शेतमाल चोरी करणे, अशा पद्धतीने भुरट्या चोरट्यांनी चोऱ्‍या करण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वसामान्य शेतकरी सगळीकडूनच मोठ्या संकटात सापडला आहे. आणि त्यातच अशा चोरट्यांनी शेतातील पिकेच चोरण्यास सुरुवात केल्याने शेतकरीवर्गासाठी नव संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांच्या जिवावर कंपन्या

"सद्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने सरकारने सर्वत्र लॉकडाउन होते . या लॉकडाउनचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तर याचाच फायदा बियाणे विक्रेत्यांनी व कंपन्यांनी चांगलाच घेतला आहे. ते आता अन्नदात्यावर उठले असल्याने त्यांच्या विनाविलंब मुसक्या आवरण्याची गरज आहे. बोगस बियाणे विक्री थांबली पाहिजे."

-मनोज मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते

प्रतिबंधक उपाययोजनांवर भर

"या संकटाशी सामना करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती माढंळने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला असून सदैव शेतकरीवर्गाच्या पाठीशी राहून शेतमाल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस व खासगी सुरक्षा एजन्सी चे सहकार्य घेण्यासाठी प्रयत्नरत आहोत. शेतकरीवर्गाने घाबरू नये. तत्काळ काही संशयास्पद आढळून आल्यास बाजार समिती मांढळ व पोलीसांना सूचना द्या."

-मनोज तितरमारे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती माढंळ

कृषी विभागाने कारवाई करावी

"बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘न घर का, न घाट का’ अशी दयनीय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी व कृषी अधिकाऱ्यांनी- बोगस बियाणे विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा व शेतकरी वाचवावा."

-निखिल धानोरकर, युवा शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com