
शेतकऱ्याने घडविला ‘विकास’; पिकांचे केले नियोजनबद्ध व्यवस्थापन
सावनेर (जि. नागपूर) : वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना शेती न परवडणारी वाटू लागली आहे. शेतकरी कुटुंबातील युवा दिवसेंदिवस शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. कुणी दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. कुठे मिळेल त्या नोकरीकडे वळताना दिसतात. परंतु, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी फळशेती, भाजीपाला शेती किंवा इतर नावीन्यपूर्ण पिकांचे उत्पादन घेण्यावर भर दिला तसेच ध्येय गाठण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याचे दाखवून दिले आहे. खापा नरसाळा येथील विकास शालीकराम गायधने असे या फळशेती व भाजीपाला उत्पादनात प्रगती साधणाऱ्या युवा शेतकऱ्याने नाव आहे.
घरी वडिलोपार्जित दहा एकर शेती. यापैकी पाच एकरात आजोबा गणपतराव गायधने यांनी लावलेली सहाशे संत्रा झाडे. उर्वरित पाच एकरात पारंपरिक पद्धतीची शेती. शेतीसोबतच आजोबांना समाजकारण व राजकारणाची आवड असल्याने घरातील मंडळी शेतीवर राबायची. त्यामुळे विलासला आपोआपच शेतीची आवड निर्माण झाली व आजोबांचा वसा पुढे चालू ठेवण्याचा निश्चय मनाशी बाळगून शालेय जीवनापासूनच आजोबांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. यातून शेतीची आवड निर्माण झाल्याने त्याने शिक्षणानंतर नोकरी किंवा इतर व्यवसायाचा विचार न करता शेतीमध्येच विशेष लक्ष देऊन परिश्रम घ्यायचे ठरविले.
हेही वाचा: जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव
कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून बागायती शेतीवर भर दिला. यासाठी कृषी मार्गदर्शन, मेळावे, कार्यशाळा व बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीला आवर्जून भेटी दिल्यात. यातून शेतीविषयक धडे गिरवून बागायती शेतीवर भर दिला. तीन वर्षांपासून आधुनिक शेतीची कास धरली. त्यांच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित दहा एकर शेतीपैकी पाच एकरात आजोबांनी लावलेल्या सहाशे संत्रा झाडांचे योग्य व्यवस्थापन ठेवून उर्वरित पाच एकरात पारंपरिक शेतीऐवजी तीन एकरात नव्याने तीनशे संत्रा झाडांची लागवड केली. यात आंतरपीक म्हणून ते भाजीपाला लागवड करीत आहेत.
दोन एकर जागेत ते कपाशी व तूर पीक घेत आहेत. पुढे सीताफळांची ३०० झाडे लागवड करण्याचे विकासचे नियोजन आहे. येथील कृषी साहाय्यक हर्षल घोडमारे यांच्या मार्गदर्शनाचा वेळोवेळी लाभ घेऊन बागायती शेतीत प्रगती साधली आहे. विकासने स्वतःचा विकास साधून परिसरातील इतर युवकांनाही शेतीकडे वळण्याचा सल्ला देत आहे. त्यांच्या या लाभदायक बागायती शेतीच्या उपक्रमामुळे ते परिसरातील युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
विकास गायधने खापा नरसाळा गावातील उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी म्हणून चर्चेत आहेत. जुन्या संत्रा झाडांच्या योग्य व्यवस्थापनामुळे यंदाचा आंबिया बार चांगलाच बहरला आहे. कोरोनाकाळात त्यांनी शेतीतील भाजीपाला थेट ग्राहकांना पोहोचविला. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळविता आला. त्यांच्याकडे जनावरे असल्याने मिळणारे शेण खत शेतीला देतात सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरतात.
हेही वाचा: थोबाडात हाणण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार
शेतकऱ्यांनी मिश्रित पिके घ्यावी किंवा शेतीमध्ये ठिबक सिंचन व्यवस्था उपलब्ध करून योग्य नियोजन केल्यास व निसर्गाची साथ मिळाल्यास फळशेती व भाजीपाला शेती फायद्याची ठरते. परंतु, यासाठी इच्छाशक्ती असावी, तसेच कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यास आर्थिक प्रगती साधणे शक्य आहे.- विकास शालीकराम गायधने, प्रगतिशील युवा शेतकरी
Web Title: Farming Business Profitable Fruit Farming Vegetables Vikas Gaidhane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..