esakal | "आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?
sakal

बोलून बातमी शोधा

 Female infant found on road in Sawner nagpur district

आई पण तुम्ही मला अक्षरशः रस्त्यावर एका कापडात बांधून फेकून दिलं? आईचं हृदय इतकं कठोर असतं का ग? आई.. काय चूक होती ग माझी? सांग ना ... काय होती माझी चूक? 

"आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

sakal_logo
By
मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) : आई....ए आई . सांग ना ग  माझी काय चूक? लहान असली तरी या जगात येण्यासाठी तुझ्याकडे हट्ट तर धरला नव्हता ना मी. आई तुझ्यामुळे मी या जगात आली हे जग बघितलं पण तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का ग? मी तर अनामिका. माझा नाव, माझा घर, माझे आई-वडील कोण हे सुद्धा मला माहिती नाही. या स्वार्थी जगात आई म्हणून तू माझे रक्षण करशील अशी खात्री होती ग देवाला म्हणूनच कदाचित त्यांनी मला पाठवलं असावं. आई पण तुम्ही मला अक्षरशः रस्त्यावर एका कापडात बांधून फेकून दिलं? आईचं हृदय इतकं कठोर असतं का ग? आई.. काय चूक होती ग माझी? सांग ना ... काय होती माझी चूक? 

एक चिमुकले स्त्री अर्भक बहुतेक आज हेच प्रश्न आपल्या जन्मदात्रीला विचारत असावे. ज्या आईने आपल्या पोटच्या गोळ्याला अक्षरशः कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिले अशा एका निर्दयी आईला ही चिमुकली प्रश्न विचारात असावी. देशात जिकडे तिकडे कोवळ्या कळ्यांना नख लावण्याच्या घटना कानावर पडत असतानाच सावनेरमधून  मन सुन्न करणारी अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे.      

सकाळी साडे सहा सात वाजताच्या सुमारास येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड यांना फोन आला की, शहरातील पाण्याच्या टाकीजवळील रस्त्याशेजारी एक नवजात बाळ आढळले आहे़  तोच बन्सोड यांनी या ठिकाणी धाव घेतली़  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना एका कापडात गुंडाळलेले बाळ दिसून आले़  जवळ जावून हात लावला असता हे बाळ हालचाल करीत असल्याने ते जीवंत असून स्त्री जातीचे असल्याची खात्री झाली़  

त्या बाळाला सुखरुप बाहेर काढून दुसऱ्या स्वच्छ कापडात ठेवण्यात आले़ घटनेची माहिती सावनेरचे ठाणेदार अशोक कोळी यांना फोन वरून देण्यात आली़  कुठलाही विलंब न करता कोळी आपल्या महिला सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़. घटनास्थळाचा पंचनामा करून बाळाला ताब्यात घेऊन थेट शासकीय रुग्णालयात पोहचले़  तेथे बाळाची तपासणी केली असता डॉक्टरांनी सांगितले की, बाळाच्या आईने तिची नाळ जास्त प्रमाणात कापल्याने तिला संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे़  त्यामुळे तिला नागपूरला उपचारासाठी रेफर करण्यात आले़  
 
जुन्या चादरीत गुंडाळले होते अर्भक

एका नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकल्याचा प्रकार येथील पाण्याची टाकी परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे हे अर्भक स्त्री जातीचे असून, त्याला जुन्या चादरीच्या कापडामध्ये घालून फेकल्याचे आढळले. अर्भकाला गुंडाळलेला कापड हा जुन्या बेडशीटचा होता़ त्यावरून हे अर्भक ज्याने फेकले त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़  स्त्री जातीचे अर्भक फेकल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे़. कुठलाही गुन्हा नसताना या बाळाला आईने कुशीत घेऊन जपण्याच्या वेळीच रस्त्यावर फेकल्याने आई ! सांग नामाझी काय चूक ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे़  

घटनास्थळ गाठून मुलीला  घेतले ताब्यात
सकाळी हितेश बन्सोड यांनी फोनवरून माहिती दिली़  लगेच घटनास्थळ गाठून मुलीला ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविण्यात आले़  याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंवी कलम 317 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे़  मुलीला नागपूर येथे रेफर करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक सागर कारंडे  घटनेचा तपास करीत  आहे.
- अशोक कोळी, 
ठाणेदार, सावनेर

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top