Nagpur Fire Accident : इतवारीतील लोहाओळी बाजारातील एका पेंटच्या दुकानाला आग

अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन जवानांची कसरत
fire breaks out at paint godown in itwari nagpur no casualties fire brigade
fire breaks out at paint godown in itwari nagpur no casualties fire brigadeSakal

नागपूर : इतवारीतील लोहाओळी बाजारातील एका पेंटच्या दुकानाला मंगळवारी आग लागली. दिवाळीनिमित्त दुकानात विक्रीसाठी आणलेला संपूर्ण पेंट, ज्वलनशील टारपीनमुळे आगीने भडका घेतला. उंच आगीच्या ज्वाळांनी परिसर हादरला. अरुंद रस्त्यांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात अग्निशमन जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. दुपारपर्यंत सतत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु दुकानातून धूर निघत असल्याने सायंकाळपर्यंत एक अग्निशमन बंब घटनास्थळी कायम होता.

इतवारीत लोहाओळीत परवेझ दाऊद यांच्या मालकीची तीन मजली इमारत असून यात त्यांचे पेंटचे दुकान होते. ते शहरातील ऑईल पेंट, वॉल पुट्टी, व्हाईट सिमेंट, टारपीन, व हार्डवेअर साहित्याचे मोठे व्यवसायिक आहे.

दिवाळीनिमित्त नुकताच त्यांनी ऑईलपेंट, टारपीन तसेच इतर साहित्याचा साठा केला होता. सोमवारी रात्री दुकान बंद करून दुकानाचे संचालक घरी गेले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास या इमारतीला आग लागली. दुकानातून धूर व आगीच्या ज्वाळा सकाळी फिरण्यास निघालेल्या लोकांना दिसल्या.

त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. लकडगंज केंद्राचे केंद्र अधिकारी अनिल गोळे तसेच गंजीपेठचे एस. पी. सयद अग्निशमन यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले. केंद्रीय कार्यालयातूनही अग्निशमन बंब रवाना करण्यात आले. परंतु दाटीवाटीची वस्ती व अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा आला. तोपर्यंत आगीने संपूर्ण तीन मजली इमारत कवेत घेतली.

इमारतीतून उंच उंच ज्वाळा दिसत असल्याने बघ्यांचीही गर्दी झाली. या गर्दीला बाजूला सारत तसेच अरुंद रस्त्यांचे आव्हानावर मात करीत अग्निशमन जवानांनी शेजारच्या इमारतीतील गॅलरी गाठली. जवळच असलेल्या विहिरीतून मोटार पंपद्वारे पाणी काढून मारा सुरू केला. ऑईल पेंट व टारपिन हे दोन्ही ज्वलनशील असल्याने पाण्याचा प्रभाव लागला नाही. परंतु जवानांनी सतत पाण्याचा मारा सुरू ठेवला.

अखेर दुपारी एक वाजेपर्यंत अग्निशमनच्या आठ बंबातून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु त्यानंतर धूर निघत असल्याने आग धूमसत असल्याचे दिसून आले. त्यामुळे घटनास्थळी एक बंब कायम ठेवण्यात आला. सायंकाळपर्यंत अग्निशमनचे जवान पाहणी करताना दिसून आले.

इतवारी बाजार थोडक्यात बचावला

इतवारी लोहाओळीलाच लागून किराणा बाजार, तंबाखू बाजार आहे. पेंटच्या दुकानाला आग लागल्यावर अग्निशमन जवान काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. अरुंद रस्त्यांची अडचण असतानाही तत्काळ स्थानिक विहिरीतून पाणी ओढून मारा केला. त्यामुळे शेजारची इतर दुकाने व बाजारही आगीपासून बचावला. सकाळची वेळ असल्याने दुकानामध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

४० लाखांचे नुकसान

दिवाळीनिमित्त दुकानामध्ये पेंट, टारपिन आदी लाखांचे साहित्य दुकानात होते. आगीच्या रौद्ररुपामुळे सारेच जळून राखरांगोळी झाले. हार्डवेअर अर्थात लोखंडी साहित्यही वितळले. यातूनच आगीची तीव्रता दिसून येते. दुकानातील विजेवरील साहित्य, खुर्ची, टेबल व इतर फर्निचरही जळाले. यात एकूण ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com