esakal | माणुसकीचा वाहणारा झरा "मग्न तळ्याकाठी'

बोलून बातमी शोधा

The flow of humanity "to the lake of joy"


हरवलेली कौटुंबिक शांतता आणि देशपांडे कुटुंबातील व्यक्तींनी सत्यस्थितीचा केलेला स्वीकार हाच या नाट्यकृतीचा गाभा आहे. रक्तात भिनलेली सरंजामशाही वृत्ती आणि मनातून न जाणारी सामाजिक उच्चतेची भावना, जमीनदार म्हणून देशपांडेशाहीचा तोरा जागोजागी नाट्यकृतीत झळकताना दिसतो.

माणुसकीचा वाहणारा झरा "मग्न तळ्याकाठी'
sakal_logo
By
राघवेंद्र टोकेकर

नागपूर : नाटककार महेश एलकुंचवार यांच्या "वाडा चिरेबंदी' नाट्यकृतीचा पुढचा भाग असलेल्या "मग्न तळ्याकाठी' नाट्यकृतीतून विदर्भातील ग्रामीण भागातील देशपांडे या सरंजामदार कुटुंबाच्या तीन पिढ्यांतील स्थित्यंतरांचे चित्रण उत्तमरीत्या दिसून येते. काळानुरूप बदलत्या आर्थिक व सामाजिक वास्तवाबरोबरच ढासळत गेलेली कुटुंबव्यवस्था, मूल्याचे पतन अन्‌ त्याचवेळी माणसाच्या खोल अंतरंगात सुप्तपणे वाहणारा माणुसकीचा झरा अशा विविध भावविश्‍वाचा संगम "मग्न तळ्याकाठी' नाटकातून अधोरेखित करण्यात आला.

अवश्य वाचा - ‘या’ वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत


हरवलेली कौटुंबिक शांतता आणि देशपांडे कुटुंबातील व्यक्तींनी सत्यस्थितीचा केलेला स्वीकार हाच या नाट्यकृतीचा गाभा आहे. रक्तात भिनलेली सरंजामशाही वृत्ती आणि मनातून न जाणारी सामाजिक उच्चतेची भावना, जमीनदार म्हणून देशपांडेशाहीचा तोरा जागोजागी नाट्यकृतीत झळकताना दिसतो. घरात असलेल्या कार्याच्या निमित्ताने एकत्र आलेलं देशपांडे कुटुंब, त्यांच्यातील अंतर्गत कलह आणि परस्पर हितसंबंधांचा संघर्ष एलकुंचवारांनी वाडा चिरेबंदीतच उलगडला होता. "मग्न तळ्याकाठी' या नाट्यकृतीत त्यानंतरची दहा वर्षे दाखविण्यात आली आहे. पुलाखालून वाहून गेलेले पाणी, परागचे लग्नं अन्‌ पत्नीसोबतचा संवाद, मुंबईहून परतलेला भास्करचा धाकटा भाऊ सुधीर, त्याची बायको अंजली आणि अमेरिकेहून परतलेला मुलगा अभय, परागने सुधीरशी केलेले भांडण अन्‌ अखेरच्या क्षणाला केलेली तडजोड अस्सल वैदर्भीय कुटुंबाचे दर्शन घडविणारी होती. नाटककार महेश एलकुंचवार यांनी देशपांडे कुटुंबाचे विरलेले नातेसंबंध, त्यातले पेच, अविश्वासाच्या निरगाठी, तरीही त्यांच्यात टिकून असलेला अंतरीचा ओलावा, प्रत्येकाच्याच मनातल्या दुखऱ्या नसा, त्याचं स्पष्ट-अस्पष्ट प्रकटीकरण अन्‌ विवेचन आणि या सगळ्यापल्याड मानवी अस्तित्वासंबंधीचे प्रभा व अभयच्या मनात चाललेले गूढ, गहिरे चिंतन, सारेच अतिशय सूक्ष्मपणे मांडलेले आहे. त्यामुळे नवोदित प्रेक्षकाला नाट्यकृती समजून घेणे जरा अवघड जाते. "वाडा चिरेबंदी'ने निर्माण केलेल्या सरंजामशाही ब्राह्मणी कुटुंबाच्या कालौघातील पतनाचा आलेख यात अधिकच रुंदावत जातो. दिग्दर्शक व्यंकटेश नाईक यांनी हा प्रशस्त कौटुंबिक-सामाजिक पट त्यातले बारकावे प्रभावीपणे मंचावर आणले आहेत. प्रत्येक पात्राचे बाह्य वर्तन-व्यवहार तसंच त्यांचे अंतर्गत मनोव्यापार, त्यातल्या मूक, विलोल हालचाली कधी प्रकट, तर कधी बोलक्‍या नि:शब्दतेतून प्रत्ययकारितेने व्यक्त होतील असे त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे नाट्यकृतीला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. नाट्यकृतीतील पात्र तसे एकाहून एक सरस होते. गोवा येथील स्कूल ऑफ ड्रामा, कला ऍकेडमीच्या सादरीकरणात भास्करची भूमिका साई कलांगुटकर यांनी, वहिनीची भूमिका पद्मा भट, सुधीर अनिकेत नांगरे, अंजीली वर्षा अश्‍वेकर, पराग हृषीकेश सावंत, अभय रुणाल कोलकणकर, आई समीक्षा सावंत, चंदू वेदांग गौडे, नंदिनी आकांशा देशपांडे, रांजू प्रितंका मांद्रेकर, प्रभा ज्योत्स्ना गौरी साकारली.