Tur Dal Price Hike : दिवाळीपूर्वी डाळींच्या भाववाढीचे फटाके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 tur dal price hike

Tur Dal Price Hike : दिवाळीपूर्वी डाळींच्या भाववाढीचे फटाके

नागपूर : खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचे डाळवर्गीय पिके अनेक ठिकाणी वाया गेली. त्याचा परिणाम बाजारभावावर दिसत आहे. किराणा सामानाच्या यादीतील तूर, उडीद, मूग डाळीचे भाव वाढले आहेत. तूर डाळीचे भाव गेल्या आठ दिवसात प्रतिकिलो चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत. डाळ ठोक बाजारात ११० रुपयांवर पोचली असून किरकोळ बाजारात १२५ ते १३० रुपये किलोवर गेली आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे तूर, मूग, उडदासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पीक अतिपावसामुळे खराब झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर तूर डाळीचे पीक चांगले बहरते. मात्र, यंदा अतिपावसामुळे तुरीच्या शेंगांची हवी तशी वाढ झालेली नाही. काही ठिकाणी पीक जळून गेले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. सततच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहे. आठ दिवसांपूर्वी घाऊक बाजारात तूर डाळ १०२ ते १०४ रुपये किलो होती. त्यात वाढ झाली असून दर आता १०८ ते ११० रुपयावर पोहोचला आहे. उडीद डाळीचा दर किलोमागे ९७ ते १०० रुपये होता. सध्या एका किलोसाठी १०५ ते ११० रुपये मोजावे लागत आहेत.

अतिरिक्त पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही संधी लक्षात घेता साठेबाजांनी डाळीचा साठा केला आहे. आवक कमी झाल्याने भाव वाढू लागले आहे. मागणी आणि आवक यात तफावत निर्माण होणार आहे. परिणामी, येत्या काही दिवसात तूरडाळीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खाद्यतेलाच्या दरात किंचित वाढ

सणासुदीमुळे हरभरा डाळीला मागणी वाढलेली आहे. मात्र, भाव स्थिरावलेले आहेत. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मीला दाखविण्यात येणाऱ्या पुरणाची चव सर्वांनाच चाखता येण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे कारण पुढे करून काही साठेबाजांनी खाद्यतेलाची कृत्रीम टंचाई निर्माण केलेली आहे. तसेच काही तेल गाळप करणाऱ्या कारखानदारांनी पुढील वर्षाच्या तेल गाळपासाठी कारखाने देखभाल दुरुस्तीसाठी काढलेले आहेत. यामुळे तेलाचा साठा केलेल्यांची चांदी झाल्याने गेल्या आठ दिवसात खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :NagpurNagpur Newstur daal