नागपूर - उड्डाणपुलामुळे अरुंद झालेला रस्ता, दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग आणि त्यात सुसाट धावणाऱ्या खासगी बसगाड्या व ऑटोमुळे सदर भागात वाहतुकीची पार ऐशीतैशी झाली आहे. येथे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांच्या जीवाला धोका असून, कोणत्याही क्षणी मोठी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
नागपूरकडून मध्यप्रदेशकडे जाणारा हा रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. या रस्त्यांवरून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सावनेर, सौंसर, छिंदवाडा, भोपाळ, इंदूर, बैतूल, जबलपूर, सिवनी, बालाघाट या शहरांकडे सुसाट गतीने वाहने धावत असतात.
या मार्गाने ऑटो, स्कुल व्हॅन, मालवाहू ट्रक, रिक्षा व सायकलीसह दुचाकी व चारचाकी वाहनांसह ट्रॅव्हल्सचीही सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे बाराही महिने येथे ‘ट्राफिक जाम’ सदृश परिस्थिती असते.
या परिसरात मार्केट, दुकाने व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ग्राहकांची सतत वर्दळ असते. शिवाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने ‘पार्क’ केलेली असतात. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.
उड्डाणपुलाने त्यात आणखी भर टाकली आहे. अशावेळी सुसाट धावणारी व अवैध प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने जीवितास धोकादायक ठरू शकतात.
विशेषतः संविधान चौक, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यालय, लिबर्टी चौक, गड्डीगोदाम चौक, सदर बसस्थानक, छावणी व मानकापूर या तीन-चार ठिकाणी सकाळी तसेच सायंकाळी वाहतुकीची सर्वाधिक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही खूप मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
बाजूच्याच कामठी रोडवरदेखील कमीअधिक प्रमाणात असेच दृश्य असते. मुळात याकडे वाहतूक विभागाचे लक्ष नसल्यामुळे अलीकडच्या काळात अवैध वाहतूक चांगलीच फोफावली आहे.
खासगी बसगाड्यांच्या वेगावर नियंत्रण व सरकारी अंकुश राहिल्यास या भागांत अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहू शकते.
भर उन्हात राहावे लागते उभे
या रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रवासी निवारे अर्थात बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात रोडच्या काठावर एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाचा आश्रय घ्यावा लागतो. बस येईपर्यंत त्यांना ऊन-पावसात तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. काही जण तर रस्ता दुभाजकावर उभे राहून बस आणि ट्रॅव्हल्सची प्रतीक्षा करीत असतात. पण हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो.
प्रवासी दिसले की थांबतात ट्रॅव्हल्स
या मार्गावर ट्रॅव्हल्स किंवा खासगी वाहनांचा एक विशिष्ट थांबा नाही. बहुतांश ट्रॅव्हल्सचालक प्रवासी दिसले की कुठेही करकचून ब्रेक दाबून मध्येच रस्त्यावर गाडी थांबवतात. अशावेळी मागून येणारे वाहन ट्रॅव्हल्सला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारांमुळेही प्रवाशांच्या समस्या व अडचणी वाढत आहेत. मागील वर्षी पुलावरून खाली येताच मानकापूरमध्ये एकमेकांवर तब्बल २५ ते ३० वाहने आदळली होती.
ट्रॅव्हल्सचालक पळवून नेतात एसटीचे प्रवासी
सदर भागात प्रवासी पळवून नेण्याचीही जणू होड दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे, सरकारी एसटी येण्याच्या अगोदर खासगी वाहनधारक आपली वाहने जोरात दामटवत नेत प्रवाशी पळवून नेतात. त्यामुळे एसटीलाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. केवळ खासगी बसेसच नव्हे, ऑटोचालकही यात आघाडीवर आहेत. ऑटोचालकांची मनमानी व मुजोरीमुळेही नागरिक कमालीचे त्रस्त असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.