

Nagpur factory blast tragedy
esakal
नागपूर : राऊळगावच्या एसबीएल कंपनीतील स्फोटात अनेकांच्या चिंधड्या उडाल्या. यामुळे शवांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान होते. सर्व १८ मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात आली. अगदी ४८ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि सर्वच मृतांची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले. १७ मृतदेह सोमवारी रवाना झाले तर २ मृतदेह मंगळवारी नेले जातील.
नातेवाईकांनी मेडिकलच्या शवविच्छेदनगृह परिसरात गर्दी केली होती. सायंकाळी ६ वाजता मृतदेहाची ओळख पटल्याचा पहिल्या अहवाल प्राप्त झाला. प्रेमदास बागडे या मृताच्या नावाचा पुकारा होताच नातेवाईक शवविच्छेदनगृहाच्या दिशेने धावत सुटले. पांढऱ्या कापडातील बागडे यांचा मृतदेह बघून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यानंतर एकापाठोपाठ ओळख पटल्याचा अहवाल येत होता, तसतसे मृतदेह घेऊन नातेवाईक रुग्णवाहिकेतून आपल्या गावाच्या दिशेने रवाना होत होते.