esakal | विदर्भातील चार जिल्हे रेड झोनमध्ये! स्थिती चिंताजनक; अमरावती, गोंदिया, गडचिरोली, बुलडाण्याचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Aner Dam

विदर्भातील चार जिल्हे रेड झोनमध्ये! स्थिती चिंताजनक

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : काही दिवसांपासून नागपूर व विदर्भात दमदार पाऊस पडत असला तरी, अनेक जिल्ह्यांमधील स्थिती चिंताजनक आहे. विदर्भातील अकरापैकी तब्बल सात जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही. चार जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. उरलेल्या एका महिन्यात पुरेसा पाऊस न आल्यास खरिपासोबतच रब्बी पिकांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निश्चितच बळीराजाची चिंता वाढणार आहे.

भारतीय हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आतापर्यंत वरुणराजाने निराशाच केली आहे. विदर्भात दरवर्षी चार महिन्यांमध्ये सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस बरसतो. परंतु, १ जूनपासून आतापर्यंत केवळ ६७२ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली, जी सरासरीपेक्षा १४ टक्के कमी आहे. पावसाळ्याचा केवळ एक महिना शिल्लक आहे. यात पुरेसा पाऊस पडला तरच तूट भरून निघणार आहे. तीन महिन्यांतील आकडेवारीचा विचार केल्यास स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही. अकरापैकी केवळ नागपूर, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांनीच सरासरी पावसात बाजी मारली आहे. उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे अमरावती (उणे २८ टक्के), गोंदिया, (उणे २५ टक्के), गडचिरोली (उणे २४ टक्के), बुलडाणा (उणे २१ टक्के) हे चार जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. याशिवाय भंडारा (उणे १७ टक्के) व अकोला (उणे १६ टक्के) या जिल्ह्यांचीही रेड झोनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

यावर्षी आतापर्यंत खरिप पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी, अजूनही पाण्याची पातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. पुरेशा पावसाअभावी रब्बी पिके अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे साहजिकच बळीराजाचीही चिंता वाढणार आहे. शिवाय कमी पाऊस झालेल्या व दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या जिल्ह्यांमध्ये आगामी उन्हाळ्यात जलसंकटही उद्भवू शकते. सप्टेंबरमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी झाली तरच पाण्याचे संकट दूर होणार आहे.

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा प्रत्यक्ष पाऊस सरासरी पाऊस

 • नागपूर ७१६ ७५२

 • अकोला ४८१ ५७५

 • अमरावती ५०९ ७०८

 • वर्धा ६३८ ७१९

 • यवतमाळ ७०३ ६७४

 • भंडारा ७९८ ९५९

 • गोंदिया ७६५ १०२१

 • चंद्रपूर ८३६ ९०३

 • गडचिरोली ८०७ १०६५

 • वाशीम ६४९ ६४६

 • बुलडाणा ४२५ ५३९

loading image
go to top