गोरेवाड्याचा गणेश गरीब रुग्णांचा तारणहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

नागपूर : गोरेवाड्याचा गणेश गरीब रुग्णांचा तारणहार

नागपूर - गेल्या दोन वर्षांपासून कोरोना गरिबांना छळतो आहे. गेल्यावर्षी तर भयावह परिस्थिती होती. दररोजचा मृत्यूचा आकडा अंगावर काटे आणणारा होता. शवागारातही जागा नव्हती. मृतदेहाला हात लावण्यासही पुढे कुणी येत नव्हते. अशा कठीण काळात गणेश चाचेरकर मात्र, कशाचीही तमा न बाळगता रात्री-अपरात्री मृतदेहांना इच्छितस्थळी नेण्याचे काम कुठलाही मोबदला न घेता करीत होता. कोरोना आज आटोक्यात आला असला तरी गणेशचे कार्य थांबलेले नाही. गरिबांच्या सेवेसाठी त्याने एक रुग्णवाहिकाच विकत घेतली आहे.

गणेश मुळचा गोरेवाडा परिसरातील. त्याचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत. त्याच प्रवास पाहिल्यास वाल्याचा वाल्मीकी झाला असेच म्हणावे लागेल. कधीकाळचा ‘दादा...भाई’ असलेला गणेश आता ज्यांचे कोणी नाही, अशा रंजल्या गांजल्यांचा ‘गणेश भाऊ’ झाला. काही वर्षांपूर्वी तो चौकात उभे राहायचा.मात्र, गरिबाला मदत केल्यानंतर मिळालेल्या समाधानातून आजचा सर्वांचा गणेश नावारुपाला आला. अनाथ मुस्लीम मुलाला जीवदान मिळावे म्हणून रात्रीचा दिवस करीत रुग्णालयाचा सर्व खर्च उचलणाऱ्या गणेशचे कार्य सलाम करण्याएवढे मोठे आहे. सामाजिक ऋण फेडण्याच्या जाणिवेची पेरणी आपल्या मुलांच्या मनात करण्यात तो सध्या गुंतला आहे.

कार्यकर्त्याला रुग्णवाहिकेचे दान

मेडिकल-मेयोसह खासगी रुग्णालयातही गरीब रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारा गरीब अनिकेत कुत्तरमारे हा कार्यकर्ता गणेश चाचेरकर यांच्या नजरेस पडला. ओळख नसताना सेवेदरम्यान ओळखीतून अनिकेतच्या कार्याची गणेशने दखल घेतली आणि त्याला चक्क रुग्णवाहिका भेट दिली. यातून रुग्णांना मोफत मेडिकल, मेयोसह घरी सोडण्याचे काम होत आहे. गणेशच्या दोन आणि अनिकेतची एक अशा तीन रुग्णवाहिकांमधून तीन वर्षात हजारांवर रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. मोफत औषधांसह रुग्णवाहिकेसाठी नातेवाईकांचे फोन दररोज त्यांना येतात.

गरीब रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका उपयोगी पडत असेल तर माझ्यासाठी ते मोठे समाधान आहे. कोरोनाने धर्म,पंथ, जातीच्या पलीकडचा विचार करण्यास आपल्याला भाग पाडले. आजारी व्यक्ती दवाखान्यापर्यंत जाण्यास असमर्थ असेल, तर मोबाईलवर क्रमांक साधून घराचा पत्ता द्यावा. तत्काळ त्यांच्या घरासमोर रुग्णवाहिका उभी राहील. या सेवेचा एक पैसाही लागणार नाही.

- गणेश चाचेरकर, नागपूर.

Web Title: Free Ambulance Service Ganesh Chacherkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top