esakal | ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवारी मोफत शहर बससेवा
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवारी मोफत शहर बससेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शहर बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज सांगितले.

महानगरपालिका व सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूरतर्फे १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शासकीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कलावंत, सैनिक, सेवानिवृत्त अधिकारी, क्रीडा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दुपारी ३.३० वाजता ज्येष्ठांतर्फे गीत गायन, नकला, मनोरंजन कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.

सकाळी ७ वाजता रामनगर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे सूर्यनमस्कार स्पर्धा होईल. शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक कार्डधारकांना शहर बसमध्ये मोफत प्रवास करता येईल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना आपली बसमधून अजब बंगला, दीक्षाभूमी, स्वामी विवेकानंद स्मारक, झिरो माईल फ्रिडम पार्क आदी स्थळांचे मोफत दर्शन घडविण्यात येईल. मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालयातून एक बस सोडण्यात येईल. यासाठी सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर सिटी या संस्थेचे सचिव सुरेश रेवतकर यांच्याकडे नोंदणी करावी लागेल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर आदी उपस्थित होते.

प्रेमविवाह करणाऱ्यांचाही गौरव

ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात आंतरजातीय विवाह तसेच प्रेम विवाह करणाऱ्या ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या जोडप्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्याकाळात समाजाच्या प्रवाहाविरोधात जाऊन विवाह करण्याच्या धाडसाला सलाम करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले.

दहाही झोनमध्ये आरोग्य शिबिर

१ ऑक्टोबर रोजी मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. कर्करोग, स्त्री रोग, दंतरोग, नेत्ररोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांची तपासणी व निदान केले जाईल.

loading image
go to top