esakal | निवडून दिले तेच करीत आहेत समाजावर घात
sakal

बोलून बातमी शोधा

निवडून दिले तेच करीत आहेत समाजावर घात

निवडून दिले तेच करीत आहेत समाजावर घात

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

नागपूर : अतिक्रमण करून बांधलेली आपलीच झोपडपट्टी अधिकृत करण्यासाठी बारा सिग्नलमधील ७५ घरांना वेठीस धरणाऱ्या राजकारण्याची चलाखी उजेडात आली आहे. निवडून देणाऱ्यावरच आघात करीत असेल तर हे अत्यंत दुदैवी आहे, अशी खंत माजी आमदार भोला बढेल यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यापूर्वी अस्पृश्यता प्रखर असताना येथील नागरिकांसाठी महात्मा गांधींच्या पुढाकारातून १९३३ मध्ये विहीर बांधली गेली. त्यावेळी गांधीजींचे सहकारी स्वातंत्र्यसैनिक पुनमचंद राका आणि भोला बढेल यांचे वडील जंगलूजी बढेल यांनी या कामी पुढाकार घेतला होता. त्याच विहीरीजवळ शनिवारी गांधीजयंती दिनी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यानिमित्ताने भोला बढेल यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले, ``चार एकराच्या वर असलेली ही जमीन मध्यप्रेदश सरकारने आम्हाला विशेष योजनेतून अनुदानातून दिली. लिजवर देण्यात आलेली नाही. मनपा प्रशासनाला याची पूर्ण माहिती दिली आहे. इथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याची नागरिकांची तयारी आहे. जमिनीचे मालक आम्ही आहोत, आमच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात येईल``, असा निर्धार बढेल यांनी बोलून दाखविला.

लोकप्रतिनिधीकडूनच शोषण

``नागपूर शहरात पंचवीसच्यावर वस्त्यांमध्ये आमची माणसे राहतात. तेथील मोजक्याच लोकांना जमिनीच्या पट्ट्याचे मालकी हक्क मिळाले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये आजही दूषित पाणी प्यावे लागते. अतंर्गत रस्ते आदी सुविधांच्याही अडचणी आहेत. आम्ही नाल्यातील पाणी पित होतो, म्हणून गांधीजींनी आमच्यासाठी विहीर बांधली. स्वातंत्र्याची पंच्चाहत्तरी उजाडली तरी दूषित पाणी प्यावे लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. या प्रश्नांवर काम करण्याऐवजी लोकप्रतिनिधी समाजाचे शोषण करत असेल तर, तो सेवक नाही तर लुटेरा असू शकतो``, अशी टीका भोला बढेल यांनी केली.

`सफाई`ची ओळख नवी पिढी बदलवतेय

``अस्पृश्यतेच्या काळात मोठा संघर्ष वाट्याला आला होता. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु आता प्रत्येक घराघरातील मुलगी-मुलगा शिकायला लागले आहे. शिक्षणामुळे मोठे परिवर्तन समाजात यायला लागले आहे. सफाई करणारा समाज म्हणून असलेली ओळख आता नवीन पिढी आपल्या कर्तृत्वाने बदलवत आहेत. समाजातील शिक्षक, पोलिस, डाॅक्टर, इंजिनिअर होत आहेत. प्रमाण कमी असले तरी येणाऱ्या पिढ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळावे यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे``, असे मत भोला बढेल यांनी व्यक्त केले.

गांधीजींच्या नावावर स्वच्छतेच्या योजना...गांधी विहीर मात्र अशी

याच वस्तीत महात्मा गांधी यांच्या हस्ते १९३३ साली उद्घाटन झालेली ही विहीर. अस्पृश्य म्हणत पाण्याचा अधिकार नाकारणाऱ्या सुदर्शन-वाल्मिकी-मेहतर समुदायासाठी महात्मा गांधींनी ती उभारली होती.गांधींजींच्या नावावर स्वच्छतेच्या महायोजना आखणाऱ्या आणि सुरू करणाऱ्या शासन, प्रशासनातील कुणालाही ही विहीर निदान गांधी जयंतीला तरी स्वच्छ करावी, असे वाटले नाही.

loading image
go to top