नागपूर - एकेकाळी नागपुरात मोठ्या प्रमाणावर कुस्तीच्या दंगली व्हायच्या. देशभरातील पहेलवान ‘मसल पॉवर’ दाखवायला येथे यायचे. आता मात्र काही पारंपरिक व्यायामशाळा आणि आखाडे आपले अस्तित्व कसेबसे टिकवून आहेत. जागोजागी थाटलेले फिटनेस क्लब आणि आधुनिकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या जिम संस्कृतीत कुस्ती चीत झाली आहे.
नागपूरच्या कुस्तीचा सुवर्णकाळ जवळून पाहणारे माजी कुस्तीपटू व संघटक हरिहर भवाळकर शहरातील आखाड्यांच्या दुरवस्थेबद्देल ‘सकाळ’शी भरभरून बोलले. ते म्हणाले, ६० ते ८० च्या दशकात नागपुरात घराआड पहेलवान दिसायचे. कुस्ती बघण्यासाठी महिला व आबालवृद्धांसह हजारोंची मैदानावर गर्दी असायची.
जगप्रसिद्ध पहेलवान रुस्तुम-ए-हिंद स्व. दारासिंग, रंधावा, किंग कॉंग, काला पहाड आणि पाकिस्तानच्या आझम व अक्रमसारख्या विश्वविख्यात पहेलवानांचा खेळ नागपूरकरांनी जवळून पाहिला आहे. धंतोली, महाल, रेशीमबाग, सिरसपेठ, मस्कासाथ, इतवारी, लालगंज, तांडापेठ, कॉटन मार्केट, सिरसपेठ, तेलंखेडी, पारडीसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुस्त्या व्हायच्या.
अगदी चित्रपटात दाखविले जाणारे चित्र एकेकाळी नागपूर शहरात दिसायचे. परंतु, आता ते सर्व इतिहासजमा झाले आहेत. आता ना पूर्वीसारखे कुस्त्यांचे फड दिसतात, ना पिळदार दंडाचे पहेलवान शिल्लक राहिलेत. नागपूरच नव्हे विदर्भातील कुस्तीलाच आता घरघर लागली आहे.
काळाच्या ओघात अनेक व्यायामशाळा बंद पडल्या आणि ज्या शिल्लक आहेत त्या भकास अवस्थेत आहेत. नागपुरात ६० व ७० च्या दशकात जवळपास शंभराच्या वर आखाडे व व्यायामशाळा होत्या. त्यात घट होऊन ही संख्या ४० वर आली. त्यापैकी सद्यःस्थितीत १० ते १२ आखाडेच सक्रिय आहेत. विविध आखाड्यांचे मिळून हजारांवर कुस्तीपटू होते.
आज पहेलवानांची संख्या ३० ते ४० वर आली आहे. तरुणांमध्ये कुस्तीबद्दल फारसे आकर्षणच शिल्लक राहिले नाही. केवळ ग्रामीण भागांतच थोडीफार कुस्ती तग धरून आहे. शहरात कुस्तीचे अस्तित्वच संपले आहे. अभिमानाने सांगता येईल, असे कुस्तीतील एकही नाव सांगता येत नाही.
कुस्तीच्या या अधोगतीसाठी असंख्य गोष्टी जबाबदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे कुस्तीला आता पूर्वीसारखा राजाश्रय राहिला नाही. बहुसंख्य व्यायामशाळा आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडून त्यांना अनुदान मिळत नाही. शिवाय तीन-तीन संघटना व पदाधिकाऱ्यांची आपापसातील भांडणेही कुस्तीला उतरती कळा लागण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण मानले जाते.
भांडणांमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. कुस्तीपटूंना प्रोत्साहन नाही, शासनाचे पाठबळदेखील नाही. नियमितपणे स्पर्धा व शिबिरे होत नसल्यामुळे युवा पिढीच्या मनात कुस्तीबद्दलचे आकर्षण संपलेले आहे.
आज तरुण मुलांचा कल पहेलवान बनण्याऐवजी ‘सिक्स पॅक’ बनविण्याकडे अधिक आहे. दारासिंग यांच्या आगमनाने चर्चेत झालेली धंतोली येथील कहाते-गोखले व्यायामशाळा नागपुरातील सर्वांत जुन्या व्यायामशाळांपैकी एक. १९१४ मध्ये कहाते आणि गोखले या मित्रांनी व्यायामशाळेची स्थापना केली.
इतर व्यायामशाळांप्रमाणे या व्यायामशाळेलाही आधुनिकतेचा फटका बसला आहे. एकेकाळी दिसणारी पहेलवानांची गर्दी आता उरली नाही. व्यायामशाळेत आजच्या घडीला बोटावर मोजण्याइतकेच कुस्तीपटू व वेटलिफ्टर सरावासाठी येतात. जुन्या काळात यशवंत स्टेडिअमवर आयोजित कुस्ती स्पर्धेच्या वेळी दारासिंग व त्यांचा भाऊ रंधावानेही याच व्यायामशाळेत सराव केला होता, असे भवाळकर यांनी सांगितले.
सीताबर्डीत व्यायामशाळेने टिकविले अस्तित्व
टेकडी रोडवरील (सीताबर्डी) सार्वजनिक व्यायामशाळा ही नागपुरातील सर्वांत जुन्या व्यायामशाळांपैकी एक. सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक वर्षे लोटूनही ही व्यायामशाळा आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या व्यायामशाळेत नियमितपणे सकाळ-सायंकाळ अशा दोन्ही सत्रांत कुस्तीपटू सरावासाठी येत असतात. येथे रामदास तडस, नारायण बोंबले, गणपत वाघाडे, दादाराव व मधुकर बुरकुडेंसारखे दिग्गज पहेलवान घडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.