
नागपूर : निम्म्या शहराचा ‘कचरा’, संकलन बंद
नागपूर - विविध मागण्यांवरून सुरू असलेल्या कर्मचारी व कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांच्या वादात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे नागपूरकर वेठीस धरले जात आहे. गुरुवारीसुद्धा एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केले. परिणामी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा घरांमध्येच पडून होता. मागील महिन्यांत बीव्हीजी या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशीचे वेतन कपात केल्याने अचानक संप पुकारला होता. त्यामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील घरांतील कचरा घरांमध्येच होता. या वादावर अखेर सायंकाळी तोडगा निघाला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कचरा संकलन सुरू झाले. यानंतर गुरुवारी पुन्हा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्यांवरून एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगरमध्ये कचरा संकलन बंद होते. परिणामी या झोनमधील जवळपास पाचशे टन कचरा घरांमध्येच पडून राहीला. गुरुवारी एजी एन्व्हायरो कंपनीचे सर्वच कर्मचारी भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरात एकत्र आले अन् अचानक संपाचे हत्यार उगारले. सकाळी अनेकजण कचरा संकलन गाडीची वाट पाहात होते. परंतु कर्मचारी न आल्याने कचरा त्यांना घरांमध्येच ठेवावा लागला. त्यामुळे कचरा संकलन व्यवस्थाच कोलमडली. कर्मचाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता संप पुकारला असल्याचे एजी एन्व्हायरो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांना त्रास का?
कंपनीसोबत कर्मचाऱ्यांच्या वादाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे, शिवाय शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणावर परिणाम होत आहे. कंपनीसोबतचा वाद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात सोडवावा, सामान्यांना का वेठीस धरले जात आहे? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
Web Title: Half Nagpur Citys Garbage Collection Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..