
नागपूरमध्ये ‘स्वाइन फ्लू’मुळे पाच मृत्यू
नागपूर : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. गुरुवारी एकाच दिवशी शहरात आठ रुग्ण आढळल्याने स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी लवकरच लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. महापालिकेला स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी पाच हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. नागपूर विभागात आढळलेल्या ७५ बाधितांपैकी ४५ जण शहरातील आहेत. सध्या ४६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. वाढते रुग्णसंख्या संख्या लक्षात घेता लवकरच अतिजोखमीच्या व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यात दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्तींना लस देण्यात येईल.
लसीकरणामुळे काही जणांना ताप येणे, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना असा त्रास होऊ शकतो. पण लसीकरण घेतलेल्यांनी घाबरू नये,असे आवाहन नागपूर महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे यांनी केले आहे. ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये शहरातील तीन, ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या व्यक्तींपासून लसीकरण मोहीम सुरू होईल. अधिक माहितीकरिता ९१७५४१४३५५ या मोबाईल क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान संपर्क करावा
स्वाइन फ्ल्यू टाळण्यासाठी….
-हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
-गर्दीमध्ये जाणे टाळा.
-स्वाइन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.
- खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
-भरपूर पाणी प्यावे.
-पुरेशी झोप घ्यावी.
- पौष्टिक आहार घ्यावा.
हे टाळा
-हस्तांदोलन अथवा आलिंगन देणे
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.
स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्या आहेत. हे लसीकरण ऐच्छिक व मोफत आहे. लसीकरण केंद्रांवरच लसीकरण होईल. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते.
डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल अधिकारी, साथरोग, मनपा