
उकाडा वाढताच मनोरुग्णांच्या संख्येत वाढ
नागपूर - पारा वाढला, उकाडा सुरू झाला. उष्माघातांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या उकाड्यात मानसिक आजारावर ‘लिथियम सॉल्ट हे औषधं दिले जाते. अशावेळी मनोरुग्णांच्या शरीरात पाणी कमी असेल याचा मनोरुग्णांच्या मनावर ताण वाढतो. यामुळे अलीकडे मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. दर दिवसाला दीडशेवर मनोरुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होत आहे. यात २५ ते ३० मनोरुग्ण बरे झालेले असून हा उकाड्याचा परिणाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला शंभरावर रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हामुळे मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. माहितीनुसार तापमानात वाढ होण्यासोबतच इतरही कारणांमुळे रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होतो. या दिवसांमध्ये मनोरुग्णांची संख्या वाढते असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. मे महिन्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. यापूर्वी मनोरुग्णालयातून जे मनोरुग्ण बरे झाले आहेत. अशांपैकी अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामुळे त्रास होतो. परिणामी चिडचिडेपणा वाढतो. उकाड्यात घाम अधिक येत असल्याने शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. अनेकदा औषधांचे नियमित सेवन न केल्यानेही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना अशी लक्षणे दिसतात. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या वागण्यात बदल होतो. उन्हाळ्याच्या हा बदल नेहमीच दिसतो. यामुळेच ओपीडीत मनोरुग्णांची संख्या वाढते.
मनोरुग्णांना जी औषधं दिल्या जातात. त्यामध्ये ‘लिथियम सॉल्ट नावाचे तत्त्व असते. यामुळे त्यांच्या शरिरात मुबलक प्रमाणात पाणी असणे आवश्यक असते. परंतु रुग्ण बरे झाल्यानंतर ते स्वत: किंवा त्यांचे कुटुंबीय याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा रुग्ण औषधी वेळेवर घेत नाहीत. अशावेळी तापमान वाढल्याने तो तणावग्रस्त होतात. यामुळे त्याच्यात मनोरुग्णासारखी लक्षणे पुन्हा दिसू लागतात. त्यांना उष्माघाताचाही धोका असतो. शरिराचे तापमान वाढल्याने मनोरुग्णांचा स्वभावही बदलतो. ते सामान्य गोष्टीवरही वाद करु लागतात. सद्यःस्थितीत प्रादेशिक मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचेही रुग्ण येऊ लागल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
मनोरुग्णांमध्ये उन्हाळ्यात दिसणारी लक्षणे
मानसिक रुग्णांवर तणाव वाढतो
झोप पूर्ण होत नाही
लवकर राग येतो
थकवा येतो.
मन विचलित होते
उन्हाळ्यात बाह्यरुग्ण विभागात मनोरुग्णांची संख्या वाढते. काही प्रकरणात बरे होऊन गेलेल्या रुग्णांच्या स्वभावात बदल दिसून येतो. अनेकदा नियमित औषधी न घेतल्यानेही समस्या निर्माण होतात. कुटुंबीय त्यांना मनोरुग्णालयात घेऊन येतात. मनोरुग्णांमध्ये बदल दिसून येताच मनोरुग्णालयात अथवा डॉक्टरांकडे दाखवायला हवे. जेणेकरुन योग्य वेळेत त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर.
Web Title: Heat Grows Increase Number Psychiatric Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..