
नागपूर : वरुणराजाने हवामान विभागाचा (Meteorological Department) अंदाज खरा ठरवत सोमवारीही उपराजधानीत दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास शहरात सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. धुवाधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून, जागोजागी मिनी तलाव साचले आहे. लागोपाठ पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील एकूणच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून, नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. पावसाचे संकट अद्याप संपलेले नाही. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी दोन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट दिलेला आहे.
रविवारी दुपारी व सायंकाळी जोरदार तडाखा दिल्यानंतर आजही मेघराजा शहरात ‘जम के’ बरसला. सकाळी सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास अपेक्षेप्रमाणे काळेकुट्ट आभाळ भरून आले. तास दीड तास शहरात जवळपास सगळीकडेच जोरदार पाऊस (Rain) बरसला. रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक चौकांना मिनी तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले होते. गुडघाभर व कंबरभर पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. भर दुपारी अंधार पडल्याने अनेकांना हेडलाईट सुरू ठेवून वाहने चालवाली लागली.
पावसामुळे येथे साचले तलाव
जोरदार पावसामुळे शहरातील पॉश मानल्या जाणाऱ्या रामदासपेठ व धंतोलीसह, बजाजनगर, सीताबर्डी, काचीपुरा, खामला, पडोळे चौक, जयताळा, गोपालनगर, स्वावलंबीनगर, सहकारनगर, नरेंद्रनगर, अजनी, बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, शंकरनगर, गोकुळपेठ, महाल, सक्करदरा, मानेवाडा रोड, हुडकेश्वर, कॉटन मार्केट, लोखंडी पूल, मेडिकल चौक, गणेशपेठ, अंबाझरी, सदर, गड्डीगोदाम, कोराडी रोड, काटोल रोड, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गोधनी, नारा-नारी इत्यादी भागांमध्ये तलाव साचल्याने चित्र पाहायला मिळाले.
घरे व अपार्टमेंट्समध्येही पाणी
संततधार पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात शहरातील सर्वच भागांना बसला आहे. केवळ झोपडपट्ट्यांमध्येच नव्हे, अनेक घरे, अपार्टमेंट्स व बेसमेंटमध्येही पाणी शिरले आहे. उत्तर नागपुरातील बहुतांश वस्त्या पाण्यात होत्या व अजूनही आहेत. काही भागांत कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याचे दिसून आले.
गार्डन, महाराजबागसुद्धा पाण्यात
रविवारपाठोपाठ सोमवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील रस्तेच नव्हे, महाराजबागसह छोटे-मोठे गार्डनही सध्या पाण्याखाली आहेत. पावसामुळे त्रिमूर्तीनगर गार्डन पूर्णपणे जलमय झाले असून, येथील लोखंडी बाकही पाण्याखाली गेले आहे. रामदासपेठ मैदानातही सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. सरस्वती विहार कॉलनीच्या शेजारील नाल्याची भिंत तुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
२० दिवसांचा पाऊस पाच दिवसांत !
गेल्या पाच दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू असून, या पाच दिवसांमध्येच २० दिवसांचा पाऊस (२३३ मिलिमीटर) बरसला आहे. यात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या १०२ मिलिमीटरसह शनिवारचा १४ मिलिमीटर, रविवारचा ७७ मिलिमीटर आणि आज सोमवारच्या ४० मिलिमीटरचा समावेश आहे. सर्वाधिक पावसाच्या जुलै महिन्यात दरवर्षी सरासरी तिनशे मिलिमीटरच्या जवळपास पाऊस पडतो हे उल्लेखनीय.
आणखी दोन दिवस अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाने (Meteorological Department) विदर्भात आणखी दोन दिवस अलर्ट दिल्याने पावसाचा जोर कायम राहणार आहे. मंगळवारी पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. याशिवाय अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, बुलडाणा व वाशीममध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवसही पावसाचेच राहण्याची दाट शक्यता आहे. छत्तीसगड व आंध्रप्रदेशसह मध्य भारतावर सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे संपूर्ण विदर्भात वरुणराजाचा कहर सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.