
Nagpur News : कान्होलीबारात सर्वात मोठे सूर्य घड्याळ
नागपूर : हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथे मध्यभारतातील सर्वात मोठे सूर्य घड्याळ आणि प्राचीन खगोल विज्ञानावर आधारित पहिले ॲस्ट्रोनॉमी पार्क साकारण्यात आला आहे. तसेच ३ हजार ३०० किलो वजनाचे भारतातील सर्वात मोठे चार फूट रुंद आणि चार फूट लांब बसाल्ट दगडावर कोरलेले श्रीयंत्र, अचूक कालनिर्णय दाखवणारे भारतातील पहिले तिथी यंत्र आणि नक्षत्र यंत्र उभारले आहे.
पवित्र व स्कंध पुराणात वर्णित गुरू बृहस्पती परिक्षेत्रात नव्याने ‘वार यंत्राची’ निर्मिती केली आहे. याची निर्मिती यंत्र वैदिक खगोलशास्त्राच्या आधारे केली आहे. भारतातील जंतरमंतर जयपूर येथे राजा जयसिंग यांनी कालगणनेची जी अचूक वेधशाळा (ऑब्जर्वेटरी) निर्माण केली आहे. त्यानंतरच्या काळात अशा वेधशाळांची निर्मिती भारतात फार कमी प्रमाणात झाली. अलीकडच्या काळात रामन विज्ञान केंद्रात आईंस्टाईन किंवा न्यूटनचे शोध दाखविले जातात.
कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कमध्ये वैदिक विज्ञानाच्या आधारावर आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी जे संशोधन केले आहे. ते दाखविण्याचा प्रयत्न आहे, असे आर्यभट्ट अस्ट्रोनॉमी पार्कचे संस्थापक आचार्य भूपेश गाडगे यांनी सांगितले.
प्रामुख्याने जे ‘वार‘ यंत्र आहे. त्यानुसार रविवार, सोमवार, मंगळवार इत्यादी वारांची माहिती सर्वांना आहे. परंतु, त्याचे विज्ञान, ते आले कुठून आले याची माहिती सांगितली जात नाही किंवा अभ्यासक्रमात शिकवली जात नाही. जगात अमेरिका, युरोप, चीन आदी देशात हे अगाध व प्रगाढ ज्ञान जसेच्या तसे वापरल्या जाते.
परंतु या मागील वैज्ञानिक भूमिका काय आहे, हे लोकांच्या समोर येण्यासाठी ‘वार यंत्रांची’निर्मिती करण्यात आली आहे. याचप्रमाणे येथील जे ‘तिथी’ यंत्र आहे, ते देखील कालगणनेसाठी सर्वाधिक अचूक असे आहे. हे यंत्र चंद्राच्या भ्रमणानुसार स्थापित करण्यात आले आहे.
चंद्राच्या आधारावर जी कालगणेची रचना आपल्या ऋषी मुनींनी केली आहे. त्याबद्दलची माहिती जिज्ञासूंना व्हावी या उद्देशाने या ‘तिथी’ यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. वैदिक तत्वज्ञान लोकांपुढे यावे. ही महत्त्वाची बाजू लक्षात घेऊनच, कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क तयार करण्यात आले आहे असेही गाडगे यांनी सांगितले.
मोहन भागवतांच्या हस्ते ‘वार’ यंत्राचे उद्या लोकार्पण
हिंगणा तालुक्यातील कान्होली बारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कचे उद्घाटन दोन मार्चला सकाळी दहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योजक कोठा जयपाल रेड्डी (तेलांगणा), बिरदविंदर सिंग शम्मी सिद्धू (पटियाला) व्हीएनआयटीचे संचालक डॉ प्रमोद पडोळे, प्रो. दिलीप पेशवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.